बिबटय़ासाठी नेत्यांची वायुदल सफारी

वायुदलाचे अतिसंवेदनशील केंद्र म्हणून सर्वसामान्यांसाठी ‘प्रतिबंधित क्षेत्र’ असलेल्या ठाण्यातील कोलशेत येथील वायुदल वसाहतीत बिबटय़ा कैद होताच

वायुदलाचे अतिसंवेदनशील केंद्र म्हणून सर्वसामान्यांसाठी ‘प्रतिबंधित क्षेत्र’ असलेल्या ठाण्यातील कोलशेत येथील वायुदल वसाहतीत बिबटय़ा कैद होताच त्याच्या दर्शनासाठी शहरातील नेत्यांनी आपल्या आप्तजनांच्या गोतावळ्यासह मन मानेल तशी वायुदल सफारी करीत बिनधास्त छायाचित्रणही केले.
कोलशेत, वायुदल, हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड या परिसरांत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने बिबळ्याचे दर्शन होत असल्यामुळे शेकडो कुटुंबे दहशतीखाली आहेत. बिबटय़ा कैद व्हावा यासाठी वन अधिकारी प्रयत्न करत असताना शिवसेनेने या प्रश्नावर स्थानिकांच्या बैठकांचा गेले काही दिवस सपाटाच लावला. त्यातून वनविभागाविरोधात वातावरण तापत होते. त्यामुळे बिबटय़ाची कैद हा घोडबंदरच्या  रहिवाशांसाठी उत्कंठेचा विषय होता. त्यामुळे मंगळवारी मादी बिबटय़ा पिंजऱ्यात कैद होताच त्याचे श्रेय घेण्यासाठी नेत्यांची फौजच वायुदल केंद्रावर अवतरली. तोवर पत्रकारांनाही सुरक्षेच्या कारणास्तव अडवत असलेले सुरक्षा अधिकारीही ही ‘फौज’ पाहून भांबावून गेले. राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोहर डुंबरे आपल्या कार्यकर्त्यांसह सर्वप्रथम अवतरले तेव्हा त्यांना जवानांनी हटकले. त्यांनी फारच आग्रह धरला तेव्हा त्यांना बिबळ्या पाहाण्यासाठी सोडण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही बिबटय़ा दर्शन व्हावे, असा आग्रह धरला. तोवर कठोरपणे वागणाऱ्या सुरक्षारक्षकांनी काही क्षणांत या कार्यकर्त्यांना इन्होव्हा गाडीतून आत सोडले. अध्र्या तासाने हे सगळे बाहेर आले आणि वायुदल वसाहतीचे चित्रण पत्रकारांना दाखवू लागले. बिबटा व वायुदल वसाहतीचा परिसर असे सगळे चित्रण या कार्यकर्त्यांनी केल्यामुळे सुरक्षेच्या वल्गना किती फोल आहेत, हे जाणवत होते.  नगरसेवकांची ही सफारी पूर्ण होत नाही तोवर शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे, राजन विचारे, प्रताप सरनाईक ही मंडळीही मोठय़ा ताफ्यासह वायुदल वसाहतीत शिरली.
लष्कराचे मौन!
सुरक्षेचे कारण सांगून पत्रकारांना जाऊ देत नाही पण नेत्यांच्या लवाजम्याला चित्रणही कसे करू देता, या प्रश्नावर सुरक्षा रक्षक निरुत्तर झाले. इतकेच नव्हे या प्रकाराबद्दल ठाणे येथील हवाई दल विभागाची जबाबदारी असलेले विंग कमांडर (ऑपरेशन्स) आर. बी. सिंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला.

बिबटय़ा सापडला.. पण सोडणार कुठे?
कोलशेत परिसरातील बंद पडलेल्या कंपनीत लावलेल्या िपजऱ्यात अडकलेल्या या मादीला नेमके कोठे सोडायचे यावर रात्री उशिरापर्यंत वन अधिकाऱ्यांत खल सुरू होता. या अडीच वर्षांच्या मादीसह आणखी एक मोठी मादी, नर आणि बछडा असे चार बिबटे या भागात असू शकतील, असे  ठाण्याचे साहाय्यक वनसंरक्षक सुधीर पडवळे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Air force colony safari of leaders to view leopard

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या