मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती स्मारकात विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहेत. त्यासाठी मुंबई विद्यापीठ आणि नवी मुंबई महापालिकेत सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून ‘डॉ. आंबेडकरांचे विचार’ या विषयावर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी २६ जून रोजी सामाजिक न्याय दिवस साजरा केला जातो. या दिनाच्या पूर्वसंध्येला २५ जून रोजी हा करार झाला. मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम होणार आहेत. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे आणि मुंबई विद्यापीठाच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांव्यतिरिक्त सामाजिक न्याय, भारतीय संविधान, महिला सक्षमीकरण, मानवाधिकार, कामगार कल्याण, पाली भाषा आणि बाल हक्क ही अतिरिक्त विशेषीकरण क्षेत्रे शैक्षणिक सहकार्यासाठी निवडण्यात आली असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

नवी मुंबई महानगरपालिकेचे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे अभ्यासकांसाठी ग्रंथसंपदा व ई लायब्ररीच्या माध्यमातून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणारे अभ्यासकेंद्र म्हणून ३ वर्षांच्या कालावधीतच नावाजले जात आहे. तथापि यापुढील काळात या स्मारकाचा उपयोग अभ्यासकांप्रमाणेच जनसामान्यांना व्हावा ही आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांची भूमिका आहे. हा पदविका अभ्यासक्रम हे याच उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने उचललेले एक यशस्वी पाऊल आहे अशी भावना आयुक्तांनी यावेळी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लवकरच आणखीही अभ्यासक्रम

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी यांनी हा पदविका अभ्यासक्रम ही एक सुरूवात असून यापुढील काळात सामाजिक न्याय, पालीभाषा व अशा प्रकारचे इतरही अभ्यासक्रम या ठिकाणी सुरू करण्यात येतील असे सांगितले. लवकरच स्मारकामध्ये मुंबई विद्यापीठाच्या सहयोगाने संशोधन केंद्र सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.