मुंबई : २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी उद्योगपती गौतम अदानी यांच्या निवासस्थानी अमित शहा, शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती, हा अजित पवार यांचा दावा शरद पवार यांनी फेटाळून लावला. राजकीय निर्णयात उद्योगपतींचा सहभाग नसतो वा त्यांच्या सल्ल्याने निर्णय घेतले जात नाहीत, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली. त्याच वेळी अजित पवार यांनीही बैठकीबाबतच्या आपल्याच विधानावरून बुधवारी घूमजाव केले.

एका वृत्तसंकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत बोलताना ‘याची शरद पवार यांना कल्पना होती’ याचा पुनरुच्चार केला. अदानी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सरकार स्थापण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार पहाटेचा शपथविधी पार पडला. मात्र, नंतर खापर माझ्यावर फोडण्यात आले, असेही अजित पवार म्हणाले होते. त्याला शरद पवार यांनी ‘साम’ टीव्हीला दिलेल्या मुलाखतीतून प्रत्युत्तर दिले. ‘अजित पवार म्हणतात माझी संमती होती. पण तसे सरकार स्थापन झाले का? असे सरकार स्थापन झाले नाही, मग हा प्रश्न येतोच कुठे,’ असा सवाल पवारांनी केला. मी उद्योगपतींची भेट घेतो. रतन टाटा, किर्लोस्कर अशा अनेक उद्याोगपतींच्या निवासस्थानी मी जात असे. राज्याच्या विकासात सहभागी होणाऱ्या उद्याोगपतींची भेट घेतली तर बिघडले कुठे? अदानी यांच्याकडे मी अनेकदा अजित पवारांना बरोबर घेऊन गेलो होतो. अदानी यांची राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे. राजकीय निर्णयात आम्ही उद्याोगपतींचा कधी सल्ला घेत नाही वा त्यांचा यात सहभाग नसतो, अशी पुष्टीही पवार यांनी जोडली.

हेही वाचा >>> दोन्ही ठाकरेंसाठी वर्चस्वाची लढाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुश्रीफांची पुष्टी; पण दादांचेच घूमजाव

अजित पवार यांची मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर अदानीबाबतच्या त्यांच्या विधानाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र, बुधवारी अजित पवार यांनीच त्यावरून घूमजाव करत ‘अदानी बैठकीला उपस्थित नव्हते’ असे उत्तर दिले. दुसरीकडे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले वैद्याकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र, बैठक झाली ही वस्तूस्थिती असल्याचा दावा केला. दरम्यान, ‘आपल्या व्यावसायिक फायद्यासाठीच अदानी यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले हे अजित पवारांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते,’ असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला.