मुंबई : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाला शंभर वर्षे पूर्ण झाली म्हणून यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. कार्यक्रमानंतर मला खासदार सुप्रिया सुळे यांनी कॉफी घेण्यासाठी बोलावले होते. तेथे शरद पवारही उपस्थित होते. आम्ही एकूण १२ जण होतो. या वेळी ‘वंचित’ने इंडिया आघाडीत सहभागी होण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक होईपर्यत काही मार्ग निघेल असे वाटत नाही, असे भाष्य वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी मुंबईत केले.
प्रकाश आंबेडकर नेहमीच शरद पवार यांच्यावर टीका करतात. या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. पण आंबेडकर यांनी या भेटीवर लगेचच खुलासा केला. खासदार कुमार केतकर यांच्यासह १२ जण या वेळी उपस्थित होते. फक्त एकत्र कॉफी घेतली. बाकी चर्चा काहीच झाली नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.