मुंबई : आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली असताना, मुंबई अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांच्या नियुक्तीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी केली. भाजपने या पदासाठी मराठी, आक्रमक स्वभावाच्या आणि मूळ पक्षातील नेत्याची निवड केली आहे.

भाजपच्या दृष्टीने मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची व अटीतटीची असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे प्रत्येक गोष्टीवर काटेकोर लक्ष ठेवून आहेत. महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी सध्याचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्याकडेच धुरा ठेवावी का, असा वरिष्ठ नेत्यांचा विचार होता. त्यामुळे तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची मुदत संपल्यावरही मंत्रिपद सांभाळणाऱ्या शेेलार यांच्याकडेच कार्यभार होता. यामुळेच अध्यक्षपद सोडण्याचा मानस शेलार यांनी दिल्लीतील नेत्यांकडे व्यक्त केला होता. मंत्रिपदी असताना चौथ्यांदा पुन्हा अध्यक्षपद शेलार यांच्याकडे ठेवल्यास पक्षात अन्य नेते या पदासाठी पात्र नाही का, अशी चर्चाही होत होती. त्यामुळे फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली आणि फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यावर साटम यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले.

मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, अतुल भातखळकर व साटम यांची नावे चर्चेत होती. पण दरेकर, लाड हे मूळ भाजपचे नसून अन्य पक्षांमधून आले आहेत. बाहेरून आलेल्या नेत्याची प्रदेशाध्यक्ष किंवा मुंबई भाजप अध्यक्षपदी अजून तरी पक्षाने नियुक्ती केलेली नाही. या पदावर मूळ भाजपच्या नेत्यालाच वरिष्ठ नेत्यांनी पसंती दिली आहे. त्यामुळे तरुण, आक्रमक, मराठी, उच्च शिक्षित व मराठा समाजातील साटम यांची निवड वरिष्ठ नेत्यांनी केली. साटम हे ऑक्टोबर २०१४ पासून सलग तीन वेळा अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. याआधी त्यांनी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वीय सचिव म्हणून काम केले होते.

भाजपची मुंबईत समर्थपणे घोडदौड : फडणवीस

अमित साटम यांच्या निवडीची घोषणा केल्यावर फडणवीस म्हणाले, शेलार यांनी मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी उत्तम सांभाळली. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत आणि गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकांमध्ये उत्तम काम केले. मंगलप्रभात लोढा यांनीही उत्तम रितीने कार्यभार सांभाळला. त्यांच्यानंतर पुन्हा शेलार यांच्याकडे धुरा देण्यात आली आणि विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. साटम हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते नगरसेवकही होते. साटम यांनी आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात संघटनात्मक जबाबदाऱ्याही यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. अभ्यासू आणि आक्रमक शैली अशी त्यांची प्रतिमा आहे. मुंबईच्या राजकारणाची जाण आणि कल्पकता त्यांच्याकडे आहे. येत्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप मुंबईत घोडदौड कायम राखेल. मुंबईत पुन्हा महायुतीची सत्ता येईल हा मला विश्वास आहे.

महापौर महायुतीचाच : साटम

मुंबईचा रंग बदलण्याचे प्रयत्न हाणून पाडून, महापालिकेवर भगवा झेंडा फडकावला जाईल आणि महायुतीचा महापौर निवडून येईल, असा विश्वास नवनियुक्त मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला. पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि गृहनिर्माण संदर्भातील विविध प्रश्न सोडविले जातील. शहराची ओळख बदलण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होत असून ते हाणून पाडले जातील. मुंबईकरांची सुरक्षा आणि सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. मुंबईचा विकास होत असताना, आमचे लक्ष नागरिकांच्या कल्याणावर राहिल, असेही साटम यांनी सांगितले.