हॉलीवूडसारखा मोठा चित्रपट उद्योग असलेल्या अमेरिकेत मराठी चित्रपट उद्योग उभारण्याच्या दृष्टीने ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ (नाफा) या संस्थेने गेल्या वर्षीपासून जोरदार प्रयत्न सुरू केले. पहिल्यांदा तिथे भव्य स्वरूपात मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले गेले. त्यानंतर गेल्या आठ महिन्यांत तिथे ओळीने मराठी चित्रपट प्रदर्शित झाले असून मराठी चित्रपटांसाठीची बाजारपेठ तिथे तयार होते आहे. अमेरिकेतील मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनातून निर्मात्यांना किमान १५ ते २० टक्के उत्पन्न मिळणार आहे, असा विश्वास यावर्षी दुसऱ्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या तयारीत गुंतलेल्या नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनी व्यक्त केला.
कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे २५ ते २७ जुलै २०२५ दरम्यान दुसऱ्या नाफा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने, ‘नाफा’च्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या या मराठी चित्रपट महोत्सवाबरोबरच अमेरिकेत मराठी चित्रपटांचे प्रदर्शन, अमेरिकेतील आणि भारतातील मराठी चित्रपटकर्मींमधील संवाद घडवून आणणे अशा वेगवेगळ्या पध्दतीने मराठी चित्रपटसृष्टी तिथे पाय रोवते आहे, असे अभिजीत घोलप यांनी स्पष्ट केले.
यंदा ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सवा’त पहिल्यांदाच मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महोत्सवात ४ मराठी चित्रपटांचा प्रीमिअरही होणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘मुक्ताई’, निखल महाजन दिग्दर्शित ‘रावसाहेब’, कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवला गेलेला गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘स्नोफ्लॉवर’ आणि अनिल भालेराव दिग्दर्शित ‘छबिला’ असे चार मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.
अमेरिकेतून मराठी चित्रपटांना १५ ते २० टक्के उत्पन्न ‘गेले आठ महिने अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांची अभिरुची लक्षात घेऊन तिथे दर महिन्याला एक मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात येतो. कॅलिफोर्नियात जवळपास ५० टक्के, शिवाय मराठी माणसांची सर्वाधिक संख्या असलेल्या शिकागो, न्यू जर्सी आणि टेक्सास या भागांवर लक्ष केंद्रित करून तिथल्या एकूण ३४ शहरांमधील चित्रपटगृहांशी प्रदर्शनासाठी करार केले आहेत. तिथे ‘सिनेमार्क’ आणि ‘रिअल’ अशा दोन चित्रपटगृह कंपन्यांची साखळी आहे. शिवाय, मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याआधी तिथे स्थानिक पातळीवर चित्रपटांच्या प्रसिध्दीबरोबरच आम्ही नाफा रेडिओ सुरू केला आहे, ज्या माध्यमातून कलाकारांच्या मुलाखती आणि अन्य कार्यक्रमातून आम्ही चित्रपटांची प्रसिध्दी करतो. तिथल्या जवळपास ५ लाख मराठी लोकांपर्यंत मराठी चित्रपट पोहोचले असून तिथे चित्रपट प्रदर्शनातून १५ ते २० टक्के उत्पन्न चित्रपट निर्मात्यांना मिळतं आहे’ असं सांगताना घोलप यांनी ‘गुलकंद’ चित्रपटाच्या तेथील प्रदर्शनाची माहिती दिली. ‘गुलकंद’ चित्रपटाची एकूण कमाई ७ ते ८ कोटी रुपये आहे, तर अमेरिकेत या चित्रपटाची कमाई जवळपास एक कोटी रुपये झाली, असं त्यांनी नमूद केलं.
मराठी चित्रपट प्रसिद्धीसाठीची साधनं…
नाफा रेडिओप्रमाणेच अमेरिकेत तयार होणाऱ्या मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी स्वतंत्रपणे ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू केला आहे, अशी माहिती घोलप यांनी दिली. अमेरिकेतील मराठी चित्रपटकर्मींनी तीन लघुपट केले जे आत्तापर्यंत ११ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून दाखवले. सध्या मराठी वेबमालिकेची निर्मितीही सुरू आहे. भारत आणि अमेरिकेतील चित्रपटकर्मींच्या कलाकृती या ‘ओटीटी’द्वारे दाखवणार आहे. यासाठी नाफाचे सदस्य आणि तिथले मराठी भाषक यांना ओटीटीचे सशुल्क सदस्य बनवून त्या माध्यमातून दोन्हीकडच्या कलाकृतींचा प्रसार करणार आहेत.
अमेरिकेतील निर्माते एकत्र…
अमेरिकेत नाफा अंतर्गत एकत्र आलेल्या मराठी चित्रपटकर्मी आणि चित्रपटप्रेमींमध्ये अनेकजण निर्माते आहेत. त्यांना चित्रपट निर्मितीमध्ये रस आहे आणि त्यात पैसे गुंतवायचे आहेत. तर हे निर्माते आणि लेखक – दिग्दर्शक यांच्यात संवाद घडवून आणण्याच्या दृष्टीने आम्ही पुढाकार घेतला आहे. मराठी चित्रपटकर्मींना अमेरिकेत काही चित्रीकरण करायचं असेल, तर त्यांना भारतातून तंत्रज्ञ, कॅमेरा आणि महत्त्वाची उपकरणं असा सगळा लवाजमा घेऊन इथे येणं खर्चिक पडतं. आता इथेही चित्रपट तंत्रज्ञ आणि तंत्रसामग्री उपलब्ध असल्याने केवळ आवश्यक कलाकारांना इथे आणून चित्रीकरण पूर्ण करता येईल. सध्या वॉशिंग्टन डीसी, कॅलिफोर्निया आणि टेक्सास इथे चित्रपटनिर्मितीसाठीचे आवश्यक स्टुडिओ तयार आहेत, असं त्यांनी सांगितलं.