कॅन्सर संशोधनात आयुर्वेदाचे योगदान…

मुंबई : ‘भारतीय संस्कृति दर्शन ट्रस्ट’च्या इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट व रिसर्च सेन्टर, वाघोली, पुणे यांच्या माध्यमातून गेली तीन दशके आयुर्वेद व ॲलोपॅथी अशा समन्वयात्मक कॅन्सर चिकित्सा व संशोधन सुरु असून संस्थेच्या केमोथेरॅपीच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करणाऱ्या आयुर्वेदिक औषधांच्या किटला अमेरिकन पेटंटची मान्यता मिळाली आहे. तसेच १० भारतीय व अमेरिकन पेटंट मान्यता मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या तीन दशकात जवळपास १५ हजाराहून अधिक कर्करुग्णांवर डॉ सदानंद सरदेशमुख तसेच संस्थेच्या माध्यमातून उपचार करण्यात आले आहेत.

संस्थेच्या माध्यमातून कॅन्सरवर करण्यात आलेल्या संशोधनाचे अनेक पेपेर आंतरराष्ट्रीय जर्ननलमध्ये प्रसिद्ध झाले असून तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही वाघोली येथील प्रकल्पाला भेट देऊन तेथील कॅन्सर रेडिएशन सेंटरचे उद्घाटन केले होते. कर्करोगावरील आयुर्वेदिक चिकित्सा, संशोधन व शिक्षण या विषयांसाठी भारतीय संस्कृती ट्रस्टच्या इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेन्टरचे जपान, ब्राझील व रशिया मधील कॅन्सर रुग्णालये व रिसर्च सेन्टर यांच्यात झालेले सामंजस्य करार ही इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेन्टरच्या कॅन्सरमधील आयुर्वेदिक चिकित्सेवरील संशोधनाची पोचपावती म्हणावी लागेल.

कालानुरूप वैद्यकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल होत असताना आयुर्वेदातील चरकसंहिता रचणाऱ्या चरकाचार्यांनी मात्र आयुर्वेद हे शास्त्र शाश्वत असल्याचे सांगितले आहे. चरक – सुश्रुत – वाग्भट या प्राचीन आयुर्वेदीय ग्रंथात वर्णन केलेल्या उपरोक्त व अन्य सूत्रांत आयुर्वेदोक्त कॅन्सर सारख्या अनुक्त व्याधींच्या चिकित्सेची व संशोधनाची बीजे रोवली आहेत हे ओळखून १९८६ मध्ये प्रसिद्ध नाडीतज्ज्ञ, आयुर्वेदाचे गाढे अभ्यासक प्रभाकर केशव सरदेशमुख महाराजांनी वाघोली, पुणे येथे कॅन्सर संशोधन प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. महाराष्ट्रातील आयुर्वेदातील पहिले पीएच. डी. वैद्य सदानंद सरदेशमुख व बॉम्बे हॉस्पिटलच्या रेडिओलॉजी विभागाचे माझी विभागप्रमुख डॉ. अरविंद कुलकर्णी यांच्या समन्वयाने सुरु झालेल्या समन्वयात्मक कॅन्सर चिकित्सेचा हा भारतातील पहिलाच नावीन्यपूर्ण प्रकल्प १९९४ मध्ये वाघोली (पुणे) व मुंबई येथे कार्यान्वित झाला.

आयुर्वेदाच्या सहाय्याने कॅन्सर पूर्णपणे बरा होत नसला तरी केमोथेरॅपी व रेडिओथेरॅपीचे दुष्परिणाम कमी करणे, कॅन्सर रुग्णांची जीवनाची गुणवत्ता सुधारणे व काही प्रमाणात आयुर्मान वाढविणे ही या प्रकल्पाची प्राथमिक उद्दिष्टे होती. मात्र ही उद्दिष्टे शास्त्रीय निकषांवर सफल होत आहेत याच्या सिद्धतेसाठी सुरुवातीपासूनच सरदेशमुख महाराजांनी या प्रकल्पात आधुनिक वैद्यक चिकित्सेबरोबर आयुर्वेदिक चिकित्सा घेणाऱ्या कॅन्सरग्रस्त रुग्णांचे बायॉप्सी, स्कॅन, रक्ततपासण्या, लोकसंख्या शास्त्रीय माहिती, आयुर्वेदानुसार रुग्णतपासणी व चिकित्सेच्या सफलतेचे मापदंड, प्रश्नावल्या या सर्वांचे दस्त ऐवजीकरण केले. यामुळे आयुर्वेदातील कॅन्सर संशोधनाची दिशा निश्चित झाली. आजपर्यंत १५,००० पेक्षा अधिक कॅन्सरग्रस्त रुग्णांचा असा दस्तऐवज व सर्व प्रकारच्या सर्व स्टेज व ग्रेडमधील कॅन्सरग्रस्त रुग्णांची आयुर्वेदिक चिकित्सा करण्याचा अनुभव या आधारे सेंटरने २०१४ मध्ये सपोर्टिव्ह केअर इन कॅन्सर या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये पहिला रिसर्च पेपर टाटा कॅन्सर सेन्टरच्या इम्युनॉलॉजी विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ सुधा गांगल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध केल्याचे वैद्य सदानंद सरदेशमुख यांनी सांगितले.

टाटा ट्रस्टने २०१५ मध्ये वाघोलीतील या सेन्टरमधील कॅन्सरग्रस्त रुग्णांमधील आयुर्वेद व ऍलोपॅथी अशा समन्वयात्मक शास्त्रीय कामाचा आढावा घेऊन भारतात अधिक प्रमाणात आढळणाऱ्या स्तनाच्या व मुखाच्या कॅन्सरमध्ये आयुर्वेदिक चिकित्सेचे योगदान शास्त्रीय पातळीवर पडताळण्यासाठी चार क्लिनिकल ट्रायलना भरीव आर्थिक अनुदान दिले. तसेच कॅन्सर रुग्णांच्या आयुर्वेदिक चिकित्सेतील महत्वाचा भाग असलेल्या पंचकर्म चिकित्सेसाठी ६० रुग्णांच्या पंचकर्म रुग्णालयाच्या उभारणीसाठी तसेच आयुर्वेदिक औषधींचे आधुनिक शास्त्राच्या निकषांवर मानकीकरण करणारी ड्रग स्टॅन्डरायझेशन व आयुर्वेदिक औषधांचा कॅन्सरग्रस्त रुग्णांवर होणारा परिणाम औधुनिक वैद्यकाच्या मानदंडांवर तपासण्यासाठी मॉलीक्युलर बायोलॉजी, इम्युनोलॉजी, झेब्रा फिश लॅबॉरेटरी यासाठीही आर्थिक अनुदान दिले व आयुर्वेदामधील कॅन्सर संशोधनाचे नवे दालन उघडले.

या अंतर्गत २०१५ ते २०२२ या कालावधीत सेन्टरने क्लिनिकल ट्रायल रेजिस्ट्री ऑफ इंडिया (सीटीआरआय) व इन्स्टिट्यूशनल एथिक्स कमिटी मान्यताप्राप्त क्लिनिकल ट्रायल मध्ये तीन स्तनाच्या कॅन्सरवर व गर्भाशय मुखाच्या कॅन्सर वरील संशोधन चाचण्या घेतल्या, ज्याचा ४०० कॅन्सर ग्रस्त रुग्णांनी लाभ घेतला. केमोथेरॅपी चालू असताना स्तनाच्या कॅन्सरग्रस्त रुग्णांमध्ये आयुर्वेदिक चिकित्सेचे योगदान, ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर व बीआरसीए १ व बीआरसीए २ हे जिनेटिक म्युटेशन असलेले स्तनाचे कॅन्सर या अतिशय घातक स्तनाच्या कॅन्सरमध्ये समन्वयात्मक आयुर्वेदिक चिकित्सेची परिणामकारकता व मुखाच्या कॅन्सरग्रस्त रुग्णांत रेडिओथेरॅपी या आवश्यक परंतु वेदनादायी चिकित्सेला आयुर्वेदाची जोड दिल्यास होणारे लाभ अशा चार संशोधन प्रकल्पांचा समावेश होता.

वैद्य सदानंद सरदेशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी निश्चित केलेली अनुभवसिद्ध आयुर्वेदिक औषधे, प्रभावी पंचकर्म चिकित्सा, रुग्णांच्या कॅन्सरसंबंधी रक्त तपासण्या व रेडिओलॉजिकल तपासण्या, रोगप्रतिकार शक्तिवर्धक व शोथनाशक ( अँटी इन्फ्लमेटरी ॲक्शन) अशा आयुर्वेदिक चिकित्सेची कार्यपद्धती आधुनिक वैद्यकाच्या निकषांवर समजून घेण्यासाठी केलेले इम्युनोलॉजीकल स्टडी व ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस मार्करस्् तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे वनस्पती व खजिने यांचे मिश्रण असलेल्या आयुर्वेदिक औषधांची निर्विषाक्तता व शुद्धता तपासण्यासाठी टाटा कॅन्सर सेन्टर येथील ऍनिमल हाऊस तसेच सीएसआयआर-एनसीएल मध्ये केलेल्या तपासण्या, डॉ सुकुमार सरदेशमुख व डॉ संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली औषध निर्मिती व त्यांची गुणवत्ता नियंत्रण असे या संशोधन प्रकल्पाचे परिपूर्ण शास्त्रीय पैलू होते.

कॅन्सर सारख्या दुर्धर व्याधीत आयुर्वेदाचे योगदान आधुनिक शास्त्राच्या आधारे अजमावण्यासाठी या चार क्लिनिकल ट्रायल हा एक वास्तुपाठच आहे. डॉ सुद्धा गांगल व डॉ विद्या गुप्ता(सीएसआयआर इमेरिटस सायंटिस) यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेल्या या संशोधनात इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेन्टर मधील १५ कॅन्सरच्या आयुर्वेदिक चिकित्सेतील तज्ज्ञ वैद्य , डॉ तुषार पाटील – मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, डॉ जगदीश शिंदे – रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, डॉ शुभदा चिपळूणकर – माजी डायरेक्टर व विभाग प्रमुख (इम्युनॉलॉजी लॅब एसीटीआरइसी) , टाटा कॅन्सर जेनेटिक सेंटरचे प्रमुख डॉ राजीव सरीन, डॉ विक्रम गोटा, डॉ राज नगरकर, डायरेक्टर, क्युरी मानवता कॅन्सर सेन्टर, नाशिक अशा आयुर्वेदिक व आधुनिक वैद्यकातील कॅन्सर तज्ज्ञ या सर्वांचे सामूहिक योगदान आहे.

याचा परिपाक म्हणून संस्थेने आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये १५ रिसर्च पेपर्स प्रकाशित केले व ११ कॅन्सर चिकित्सेत प्रभावी अशी आयुर्वेदिक औषधांची भारतीय व अमेरिकन पेटंट्स प्रकाशित केली. यापैकी केमोथेरॅपीच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करणाऱ्या एका अमेरिकन पेटंटला मान्यता मिळाली आहे. सदर क्लिनिकल ट्रायल मध्ये समाविष्ट आयुर्वेदिक औषधी योगांपैकी मुखांच्या कॅन्सर मध्ये रेडिओथेरॅपी दरम्यान प्रभावी आयुर्वेदिक औषधी योगाचे एक किट, स्तनाच्या कॅन्सर मध्ये केमोथेरॅपीचे दुष्परिणाम कमी करणाऱ्या आयुर्वेदिक औषधांच्या योगांचे दोन किट, ट्रिपल नेगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर व बीआरसीए १ व बीआरसीए २ म्युटेशन असलेल्या स्तनाच्या कॅन्सरग्रस्त रुग्णांत जीवनाची गुणवत्ता सुधारणाऱ्या व आयुर्मान वाढविणाऱ्या आयुर्वेदिक औषधी योगांचे दोन किट अशा पाच किटची निर्मिती व वितरण अथर्व नेचर हेल्थकेअर प्रा. लि. तर्फे केले जात असल्याचे डॉ. विनिता देशमुख यांनी सांगितले.

इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेन्टरमधील कॅन्सर व आयुर्वेद चिकित्सा या वरील संशोधनाच्या आधारे सेन्टरने आजपर्यंत ५० हून अधिक रिसर्च पेपर्स आंतरराष्ट्रीय नामांकित जर्नल्समध्ये प्रकाशित केले आहेत. त्यातही जर्नल ऑफ आयुर्वेद अँड इंटिग्रेटीव्ह मेडिसिन (JAIM) या नामांकित आयुर्वेदाच्या जर्नलच्या कॅन्सर वरील विशेष आवृत्तीत १६ रिसर्च पेपर्स प्रकाशित केले आहेत. कॅन्सर व आयुर्वेद या विषयावर जगभरात चालू असलेले संशोधन एका व्यासपीठावर यावे या उद्देशाने इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेन्टरने आजपर्यंत ‘आयुर्वेद फॉर कॅन्सर’ या ६ आंतरराष्ट्रीय परिषदांचे दर पाच वर्षांनी आयोजन केले आहे, ज्यात देश – विदेशातील कॅन्सर चिकित्सक व शास्त्रज्ञ सहभागी होतात. या केंद्रातील कॅन्सर – आयुर्वेद विषयक संशोधनास विद्यापीठ स्तरावरही मान्यता मिळाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजपर्यंत डॉ वासंती गोडसे, डॉ श्वेता गुजर – असिस्टन्ट डायरेक्टर, डॉ स्वप्ना कुलकर्णी – रिसर्च असोसिएट, डॉ भाग्यश्री सरदेशमुख, डॉ नीलांबरी सरदेशमुख – सिनियर रिसर्च फेलो, डॉ अंजली देशपांडे – विभाग प्रमुख – कायचिकित्सा विभाग, डॉ सुश्रुत सरदेशमुख – असोसिएट प्रोफेसर – कायचिकित्सा विभाग, डॉ शिवानी गवांडे व डॉ अनया पात्रीकर अशा ९ आयुर्वेद तज्ज्ञांना विविध प्रकारच्या कॅन्सरमधील आयुर्वेदिक चिकित्सेच्या परिणामांवरील संशोधनास पीएच. डी. प्राप्त झाली आहे. तसेच डॉ अनिता शिंगटे, डॉ अमृता साळुंके व डॉ अभिषेक साळुंके – सिनियर रिसर्च फेलो यांना एम. फिल प्राप्त झाली आहे. डॉ विनीता देशमुख – डेप्युटी डायरेक्टर यांनाही ब्रेस्ट कॅन्सर – ॲन आयुर्वदिक प्रॉस्पेक्टिव्ह या विषयावर पोस्ट डॉक्टोरल मिळाली आहे. डॉ श्रीनिवास दातार – असिस्टन्ट डायरेक्टर, डॉ समीर गोरे – कॅन्सल्टंट, डॉ विनिता आवळकंठे, डॉ संज्योग आवळकंठे, डॉ प्रज्ञा कोद्रे, डॉ सुषमा भुवाड, डॉ स्नेहा सुर्वे, डॉ सुचिता वैद्य, डॉ धनंजय देशपांडे अशा अनुभवी आयुर्वेदिक कॅन्सर तज्ज्ञाचेही या संशोधनात भरीव योगदान आहे.