मुंबई: अंधेरी येथे सोमवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाहनाने धडक दिलेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही घटनेत वाहनचालक अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेले होते. मात्र एमआयआडीसी पोलिसांनी दोन्ही घटनेतील फरार चालकांना काही तासातच अटक केली. ऑक्टोबर महिन्यातील दोन आठवड्यांतील ही हिट ॲण्ड रनची चौथी घटना आहे.

डंपरच्या धडकेत ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू

पहिली घटना सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास महाकाली लेणी रस्त्यावर घडली. मरियम्मा हरिजन (६३) या कचरा वेचणाऱ्या महिला चकाला सिग्नलवरून साठे चौकाकडे रस्ता ओलांडत होत्या. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या एका डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेमुळे मरियम्मा खाली कोसळल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, डंपर चालक मरियम्मा यांना कोणतीही मदत न करता आपले वाहन तेथेच सोडून पळून गेला. मरियम्मा यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अनुजकुमार सरोज (३३) या डंपर चालकाला अटक केली.

टेम्पोच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

दुसरी घटना सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास घडली. अमोल मगर (२४) हा तरुण एका खासगी कंपनीत स्वच्छतेचे काम करत होता. दुपारी ३.३० वाजता त्याने घरी परत येत असल्याचे पत्नीला कळवले होते. तो जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रस्त्यावरील वेदान्त पेट्रोल पंपाजवळून पायी जात असताना, मागून आलेल्या एका टेम्पोने त्याला धडक दिली. या धडकेमुळे अमोल खाली पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. टेम्पो चालकही तात्काळ घटनास्थळावरून फरार झाला. अमोलला कूपर रुग्णालयात नेण्यात आले. पण सायंकाळी ६ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दोन्ही घटनेतील फरार चालकांना अटक

एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे दोन्ही प्रकरणातील फरार चालकांना काही तासांतच शोधून काढले. दुसऱ्या घटनेतील आरोपी, राजू यादव (२६) यालाही अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींवर निष्काळजीपणामुळे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही चालकांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे, असे एमआयडीसी पोलिसांनी सांगितले.

‘हिट ॲण्ड रन’ म्हणजे काय?

‘हिट ॲण्ड रन’ म्हणजे वाहनचालकाने अपघात घडवून आणल्यानंतर जखमी किंवा मृत व्यक्तीला मदत न करता घटनास्थळावरून पळून जाणे. अशा प्रकरणांमध्ये निष्काळजीपणे वाहन चालवणे, मृत्यू किंवा गंभीर दुखापत करणे आणि मदत न करणे यांसारख्या कलमांखाली गुन्हे दाखल केले जातात.

ऑक्टोबर महिन्यातील ‘हिट ॲण्ड रन’ च्या घटना

  • मानखुर्द

शीव-पनवेल महामार्गावर मानखुर्द टोल नाक्याजवळ ६ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री एका ४५ वर्षीय डिलिव्हरी बॉयला भरधाव कारने धडक दिली आणि नंतर तो एका खासगी बसखाली चिरडला गेला, त्यात त्याचा मृत्यू झाला. वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला, तर बस चालकावरही निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • घाटकोपर

पूर्व द्रुतगती महामार्गावरील (ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे) कामराज नगर अंडरपासजवळ ८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री भरधाव वेगात धावणाऱ्या गाडीने एका पादचाऱ्याला धडक दिली. जखमी पादचाऱ्याला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक पळून गेला.

  • बोरिवली

बोरीवली पश्चिम येथे ११ ऑक्टोबर २०२५ रोजी एका अज्ञात रिक्षाचालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या सात वर्षीय मुलीला धडक दिली आणि तो पळून गेला. यात मुलीच्या पायाला दुखापत झाली आहे.