मुंबई: ‘घरबसल्या ऑनलाईन काम करून पैसे कमवा’ अशा जाहिराती करून तरुणांची फसवणूक केली जात आहे. अंधेरी येथे एका तरुणीची अशाच प्रकारे ऑनलाईन काम करण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली असून तिला कामाचे पैसे न देता उलट तिलाच धमकावून पैसे उकळण्यात आले. या प्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी २२ वर्षीय तरुणी ही अंधेरीत राहते. तिला २७ मे रोजी तिला अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. इन्फोटेक नावाच्या कंपनीतून बोलत असल्याचे त्या अनोळखी व्यक्तीने सांगितले. घरबसल्या (वर्क फ्रॉम होम) डेटा एण्ट्रीचे काम असून हे काम ४ दिवसांचे आहे. त्या कामाचे १५ हजार रुपये दिले जातील असे त्या व्यक्तीने सांगितले. काम केवळ ४ दिवसांचे आणि घरातूनच करायचे असल्याने तरूणी त्या कामासाठी तयार झाली. तिने सांगितल्यानुसार ४ दिवसात काम पूर्ण करून दिले. मात्र पैसे देण्याऐवजी समोरील अनोळखी व्यक्तीने या कामात अनेक चुका असल्याचे सांगितले. तसेच नुकसान केले म्हणून पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. यामुळे तरूणी घाबरली. तेव्हा हे प्रकरण मिटविण्यासाठी त्या अनोळखी व्यक्तीने तिच्याकडे १० हजार रुपये मागितले. घाबरलेल्या तरुणीने त्या अनोळखी व्यक्तीच्या खात्यात १० हजार रूपये पाठवून दिले. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे नंतर तिच्या लक्षात आले. तिने पालकांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (क), ६६ (ड) तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) आणि ३१९ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या अनोळखी आरोपीचा शोध घेत आहेत.
सध्या वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली भामटे जाहिराती करून लोकांना आपल्या जाळ्यात ओढत असतात. त्यामुळे खातरजमा केल्याशिवाय अशा जाहिरातींना बळी पडू नये आणि आर्थिक व्यवहार करू नये असे आवाहन अंबोली पोलिसांनी केले आहे.