मुंबई महापालिकेकडून काही भागांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा सुरू आहे. याविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाने सोमवारी (२६ जून) मुंबई महापालिकेच्या कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा नेला. आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना मारहाण केली. मुंबई महापालिकेच्या एच पूर्व कार्यालयात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राडा केला.

काही दिवसांपूर्वी वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली होती. ही शाखा अनधिकृत असल्याचे सांगत ही कारवाई करण्यात आली होती. परंतु, यावरून ठाकरे गट आता आक्रमक झाला. शिवसेनेची शाखा तोडल्याचा राग उफाळून आल्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, या मोर्चाचं नेतृत्व करणारे आमदार अनिल परब यांनी मोर्चा आणि महापालिका अधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणावर उत्तर दिलं आहे.

शिवसेनेच्या शाखेवर पालिका अधिकाऱ्यांनी बुलडोझर चालवला तेव्हा शाखेत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता, असा दावा ठाकरे गटाने केला आहे. पालिका अधिकाऱ्यांनी या फोटोवर हातोडा चालवला असल्याने शिवसैनिक संतापले असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं. दरम्यान, एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात पालिकेचे अधिकारी शिवसैनिकांना कारवाईच्या आधीच सांगत होते की, शाखेतील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढून घ्या. त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अनिल परब यांना प्रश्न विचारला की, पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं तेव्हाच फोटो आणि मूर्ती का काढून घेतली नाही? त्यावर अनिल परब यांनी उत्तर दिलं आहे.

हे ही वाचा >> मानसिक आजारातून बरे झालेल्यांना मदतीचा हात; राज्य सरकार उभारणार १६ पुनर्वसन केंद्र

आमदार अनिल परब म्हणाले, पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं तेव्हा आम्ही मूर्ती आणि फोटो काढण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही त्यांना म्हणालो तुम्ही सांगितलेलं त्याप्रमाणे आम्हाला फोटो घेऊ द्या. आम्ही त्यांना विनंतीही केली. पण त्यांनी आम्हाला फोटो काढू दिला नाही. त्यांनी ताबडतोब बुलडोझर चालवला. बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा मारताना त्यांना काहीच वाटलं नाही. बाळासाहेबांना राज्य शासनाने राष्ट्रपुरुषाचा दर्जा दिला आहे. त्यांच्या फोटोवर हातोडा मारणाऱ्यांवर हे सरकार काय कारवाई करणार? या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोवर आमचं आंदोलन सुरूच राहील.