मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी कांदिवलीतील सावली बारवरून मंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली असतानाच आता जगबुडी नदीच्या वाळू उपशावरूनही त्यांना लक्ष्य केले आहे. जगबुडी नदीतील वाळू योगीता डेंटल कॉलेजच्या प्रांगणात कशी आली असा सवाल करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.

अनिल परब यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करण्याचा इशारा शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दिला आहे. याबाबत पत्रकार परिषद घेत अनिल परब यांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा लावून धरली. कांदिवली परिसरातील सावली बार आपल्या पत्नीच्या नावे असल्याचे खुद्द रामदास कदम यांनीच सांगितल्याने त्याच्या मालकीबाबत काही अस्पष्टता राहिलेली नाही.

डान्सबारमध्ये मुली नाचवून अश्लीलता पसरवली जाते, पोलिस स्टेशनच्या अगदी जवळ हे चालतेय, यावर कोण कारवाई करणार? समाजविघातक कृत्यांवर कारवाई करणे चांगलेच आहे, पण स्वत:च्या आईच्या नावाने जो डान्सबार चालतोय, त्यावर कोण कारवाई करणार, असा सवाल त्यांनी केला. या बारवर धाड पडली तेव्हा बारमधील २२ बारबाला, २२ गिऱ्हाईक आणि चार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

ही सगळी माहिती पोलिस रेकॉर्ड आणि एफआयआरमध्ये आहे. मला माहितीच्या अधिकारातंर्गत ही माहिती मिळाली. त्यामुळे ती खोटी असू शकत नाही, असे ते म्हणाले. योगेश कदम यांनी अर्धवट वकील म्हणून संबोधल्याचाही त्यांनी समाचार घेतला. विधानसभेत मी अर्धवट वकील म्हणून बोलत नाही. विधानसभेत मी आमदार म्हणून बोलतो, मी चौथ्यांदा आमदार झालो आहे. त्यामुळे मला विधानसभा नियम आणि कायदे चांगले माहिती आहेत. मला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, अशी टीका त्यांनी केली.

गृहमंत्री फडणवीसांना वाढदिवसानिमित्त त्यांच्या सहकाऱ्याचे सगळे प्रताप भेटरूपाने देणार होतो. पण ते आज मुंबईत नव्हते. उद्या ते मुंबईत आल्यावर त्यांच्याकडे सगळी कागदपत्रे सोपवली जातील. सावली डान्सबारने सर्व नियम मोडले आहेत. ऑर्केस्ट्रासाठी पाच मुलींना परवानगी असताना १४ मुली सापडल्या. नृत्य करताना मुली लगट करत होत्या, हे सगळे पोलीस रेकॉर्डमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

जगबुडी नदीतील वाळू योगीता दंत महाविद्यालयाच्या प्रांगणात!रत्नागिरीमधील जगबुडी नदीतील गाळ काढला जात आहे. हा गाळ काढण्यासाठीचे काम मिळावे म्हणून कदमांकडून मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिण्यात आले. हा वाळू मिश्रित हा गाळ आहे. यामध्ये वाळू वेगळी केली जाते. ही वाळू योगीता दंत महाविद्यालयाच्या प्रांगणात पडली आहे. हे कॉलेज योगेश कदम यांच्या बहिणीचे आहे.

जगबुडी नदीतील ही वाळू या योगीता योगीता दंत महाविद्यालयाजवळ कशी आली? ही वाळू येथे काय करतेय? या वाळूचे काय केले जाते? असे सवाल अनिल परब यांनी उपस्थित केले. तसेच जिथे जिथे वाळू पडली त्याचे आम्ही जिओ टॅग लावून ड्रोन कॅमेरामार्फत शूट केले आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आहेत. मी याचे पेन ड्राईव्ह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्या देणार आहे. फडणवीसांनी राजीनामा घ्यावा, अन्यथा मी कोर्टात जाईन, असा इशाराही परब यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.