मुंबई : मुंबई उपनगरीय लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. वाढत्या नागरिकरणामुळे मुंबई महानगरातील रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत आहे. परिणामी, गर्दीचा फायदा घेऊन गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे. सध्या कार्यरत असलेल्या कुर्ला, वडाळा, कल्याण, वाशी रेल्वे ठाण्यांवरील कामाचा भार हलका करण्यासाठी आसनगाव, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) रेल्वे पोलीस ठाण्याचे १५ ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांतील सुरक्षेला बळकटी येणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये कल्याण – कसारा दरम्यानच्या प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. मुख्यत: शहाड, टिटवाळा, वासिंद, आसनगाव या भागात नागरी वस्ती वाढल्याने रेल्वेवर अवलंबून असलेल्या प्रवाशांच्या संख्येत भर पडली आहे. तसेच देशभरातून लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमधून एलटीटीमध्ये दाखल होणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढू लागली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये वाद, मारामारी, मोबाइल आणि मौल्यवान वस्तूंची चोऱ्या वाढली आहे. तसेच फटका टोळी व इतर चोरांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. परंतु, कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यावर कल्याण – बदलापूर आणि कल्याण – कसारा या रेल्वे स्थानकांचा भार असल्याने, गुन्हेगारांना रोखण्यात, आरोपींचा शोध घेण्यात विलंब लागत होत आहे. त्याचप्रमाणे कुर्ला, वडाळा, वाशी या रेल्वे पोलीस ठाण्यांवरही कामाचा भार वाढल्याने चोरीच्या प्रकरणांचा छडा लावण्यासाठी विलंब होत आहे.
आसनगाव, एलटीटी रेल्वे पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘ही’ स्थानके
कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यातील टिटवाळा, खडवली, वासिंद, आसनगाव, आटगाव, तानशेत, खर्डी, उंबरमाळी, कसारा ही ९ रेल्वे स्थानके आसनगाव रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतील. तर, कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यातील एलटीटी; वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यातील कुर्ला हार्बर फलाट क्रमांक ७-८, टिळक नगर, चेंबूर आणि वाशी रेल्वे पोलीस ठाण्यातील गोवंडी, मानखुर्द ही रेल्वे स्थानके लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आली आहेत.
कोण ठरले पहिले वरिष्ठ पोलीस निरीक्षक
लोहमार्ग पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर यांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक जबार तांबोळी यांची एलटीटी रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी, तर, पोलीस निरीक्षक सचिन मोरे यांची आसनगाव रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नेमणूक करण्यात आली आहे.
आणखी दोन रेल्वे पोलीस ठाणी वाढणार
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरून दररोज सुमारे ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर १९९९ पासून एकूण १७ रेल्वे पोलीस ठाणी आहेत. आता आसनगाव आणि एलटीटी या दोन रेल्वे पोलीस ठाण्यांसह अंबरनाथ आणि भाईंदर येथे नवीन रेल्वे पोलीस ठाणी उभारण्यात येणार आहेत.
आसनगाव आणि एलटीटी या रेल्वे पोलीस ठाण्याचे उद्घाटन १५ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर यांनी दिली.