मुंबई : ‘गायक – संगीतकार म्हणून श्रीधर फडके यांनी महाराष्ट्राच्या संगीताला अतुलनीय देणगी दिली आहे. त्यांची गाणी म्हणजे खरेतर एक समाधान आहे, ‘पिंड ते ब्रम्हांड’ इतका विशाल व्याप त्यांच्या संगीतात आहे. त्यांनी आयुष्यभर संगीतक्षेत्राला मनसोक्तपणे भरभरून दिले, पण नियतीने मात्र त्यांच्या वाट्याला कठोरता आणली’ असे सांगतानाच महाराष्ट्रानेही त्यांना देण्यात कद्रूपणा दाखवला, अशी खंत सांस्कृतिक कार्यमंत्री व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केली. यापुढे त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
प्रसिध्द गायक – संगीतकार श्रीधर फडके यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त विलेपार्ले येथील मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात ‘झाले मोकळे आकाश…’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. प्रसिध्द गायक सुरेश वाडकर, डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे, लेखिका सुकन्या जोशी, गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर, चित्रा श्रीधर फडके, उत्तरा केळकर, अरुणा हेटे, पं. उपेंद्र भट आदी मान्यवरही यावेळी उपस्थित होते. त्यांचा सांगीतिक प्रवास उलगडणाऱ्या सुकन्या जोशी लिखित ‘अमृताच्या जणू ओंजळी’ या पुस्तकाचे प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात आले. डिंपल प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
माझ्यावर बाबुजींचा प्रभाव नव्हता…
प्रख्यात गायक – संगीतकार सुधीर फडके अर्थात बाबुजींचे चिरंजीव म्हणून लहानपणापासूनच त्यांच्या गाण्याचे संस्कार मनावर झाले. पण म्हणून बाबुजींच्या संगीताचा प्रभाव आपल्यावर नव्हताच. आपल्या चाली स्वतंत्र होत्या, असे श्रीधर फडके यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. ‘गाण्यांचा जन्म लहानपणापासून पाहिल्याने मला चाली करण्याचा छंद लागला. ‘गीत रामायणा’चे संस्कार मनावर झाले, अशी आठवण सांगतानाच लता मंगेशकर यांनी आपले गाणे गाण्याची इच्छा व्यक्त केली, तो आयुष्यातील मोठा पुरस्कार होता, असेही ह्रद्गत त्यांनी व्यक्त केले.
राजकारण्यांचे राग वेगळे…
‘अशा मंचावर राजकारण्यांचे काही काम नसते; कारण तुमचे स्वर वेगळे, आमचे वेगळे. तुमचे राग वेगळे, आमचे वेगळे. तुमच्या चाली वेगळ्या, आमच्या वेगळ्या; पण संगीतातील अवघड चालींना सोप्या पद्धतीने श्रोत्यांसमोर आणणारे मशीन श्रीधर फडके यांच्याकडे आहे’, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी श्रीधर फडके यांचे भरभरून कौतुक केले.