मुंबई : कीर्तनातून डोळ्यांत अंजन घालण्याची किमया कीर्तनकार साधत असतात. आपल्या कृतीतून व वाणीतून समाजमनावर सकारात्मक संस्कार करण्याचे काम सातत्याने कीर्तनकार करीत असतात. याप्रमाणे ह. भ. प. अश्विनी महाराज टाव्हरे गावोगावी पर्यावरण प्रबोधनाची वारी नेण्याचे काम करीत आहेत. त्या ज्या खेडेगावात कीर्तनासाठी जातात, त्या ठिकाणी एक रोप लावतात आणि त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणाहून कीर्तनाचे निमंत्रण आल्यावर दिलेल्या रोपाची योग्य ती देखभाल केली जाते का? हे पाहून त्या ठिकाणी पुन्हा कीर्तन करण्यासाठी होकार किंवा नकार कळवतात. येत्या ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कीर्तन सादरीकरणाचा विशेष भाग सकाळी ८.०० वाजता सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमात रंगणार आहे.

ह.भ.प. अश्विनी महाराज टाव्हरे या पुणे जिल्ह्यातील बारामती येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करीत असतानाच महिला कीर्तनकार म्हणून नावारूपाला आल्या. अध्यात्माचा आणि पर्यावरणाचा सुवर्णमध्य साधून ह.भ.प. अश्विनी महाराज टाव्हरे यांचा चालू असलेला प्रवास अविश्वसनीय आहे. आपले कर्तव्य बजावत असताना पर्यावरणासाठी काही तरी करण्याच्या उद्देशाने त्या ज्या-ज्या खेडेगावात कीर्तनासाठी जातात तिथे – तिथे एक रोप लावतात आणि त्या रोपाची काळजी घेण्याची जबाबदारी तिथल्या गावकऱ्यांवर सोपवतात. पुन्हा त्याच ठिकाणाहून कीर्तनाचे निमंत्रण आल्यावर दिलेल्या रोपाची योग्य ती देखभाल घेण्यात आली आहे की नाही याची खातरजमा करूनच कीर्तनाला होकार द्यायचा की नकार ते ठरवतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गावोगावी पर्यावरण प्रबोधनाची वारी नेत ह.भ.प. अश्विनी महाराज टाव्हरे यांनी पर्यावरण शिक्षणाची एक चळवळ त्यांनी उभी केली आहे. ‘आजूबाजूला अनेक नकारात्मक गोष्टी घडत असतात, तरी यामधील सकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रित करून त्यांना प्रकाशझोतात आणण्याचे काम मला महत्त्वाचे वाटते. माझ्या कीर्तनातून समाजाला आदर्शांकडे नेण्याचा माझा प्रयत्न आहे,’ असे ह.भ.प. अश्विनी महाराज टाव्हरे यांनी सांगितले. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार, सकाळी ८.०० वाजता सोनी मराठी वाहिनीवरून प्रसारित होत आहे.