मुंबई : २२१ वर्षांचा ‘प्राच्यविद्या’ संशोधनाचा वारसा असलेल्या ‘दि एशियाटिक सोसायटी’ची (मुंबई) उद्या होणारी निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. आता ही निवडणूक मतदार याद्या अद्ययावत झाल्यानंतर होईल, असे सोसायटीकडून सांगण्यात आले.

सभासद नोंदणी वाद भोवला

३ आॅक्टोबर रोजी संस्थेच्या रिक्त १९ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. ४५ सदस्यांनी उमेदवारी दाखल केली होती. कुमार केतकर विरुद्ध विनय सहस्त्रबुद्धे या काँग्रेस व भाजपच्या माजी खासदारांमध्ये अध्यक्षपदासाठी चुरस होती. मतदानाची तयारी झाली होती. ३ ऑक्टोबर पर्यंतच्या सभासदांना मतदानास पात्र ठरवल्याबाबत कुमार केतकर गटाने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली हाेती. न्यायालयाने धर्मादाय आयुक्तांचा निर्णय रद्दबातल ठरवत मतदार याद्या अद्ययावत करण्याचे आदेश दिले आहेत.

शुक्रवारी सकाळी ‘एशियाटिक’च्या कार्यकारणी सदस्यांची बैठक झाली आणि निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. ३ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान ज्या १३३० सभासदांची नोंदणी झाली आहे, त्यांनाही मतदानाचा यावेळी अधिकार मिळणार आहे. मतदानासाठी संस्थेचे ओळखपत्र बंधनकारक आहे. त्यामुळे मतदानास अपात्र ठरवलेल्या सभासदांची ओळखपत्रे तयार करणे आणि एकुण मतदार याद्यांची छाननी व अद्ययावत करण्याचा कार्यक्रम संस्थेने आता हाती घेतला आहे.

शह-काटशह

‘एशियाटिक’चे मार्चपर्यंत ३१२४ सभासद होते. मार्चनंतर भाजप व उजव्या विचारसरणीच्या संघटना -कार्यकर्त्यांनी सुमारे ३५० इतकी सभासद नोंदणी केली. संस्थेवर ताबा मिळवण्यासाठी भाजप मैदानात उतरल्याचे लक्षात येताच शरद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेसचे कार्यकर्तेही जागे झाले. त्यांनी हजारपेक्षा अधिक सभासदांची १५ ऑक्टोबर पर्यंत नोंदणी केली.

निवडणुका जाहीर झाल्यानंतर (३ ऑक्टोबर) विशिष्ट हेतू ठेवून सभासद नोंदणी केली आहे, अशी भाजपच्या विनय सहस्त्रबुद्धे गटाने धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली. आयुक्तांनी तत्काळ दखल घेत ३ आॅक्टोबरपर्यंच्या सभासदांनाच यावेळी मतदान करता येईल, असा निकाल दिला. त्याचा फटका काँग्रेसच्या कुमार केतकर गटाला बसणार होता. केतकर गटाने न्यायालयात धाव घेत त्यावर मात केली.

संस्था ताब्यात घेण्याचे प्रयत्न

‘एशियाटिक सोसायटी’ अकादमिक क्षेत्रातील प्रतिष्ठीत संस्था आहे. २२० वर्षात या संस्थेचे अवघे ३६०० सभासद राहिलेले आहेत. मात्र उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी मुंबईतील महत्वाचे सार्वजनिक न्यास ताब्यात घेण्याची रणनिती आखली असून त्याचा फटका मागच्या महिन्यात झालेल्या गिरगावच्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणुकांना बसला.एशियाटीकच्या निवडणुकांना तर पक्षीय, धार्मीक व भाषिक रंग चढला होता. यातूनच गेल्या सहा महिन्यात १६०० नवीन सभासदांची भर पडली. त्यामध्ये राजकीय पक्षाच्या कार्यालयातले कर्मचारी, राजकीय कार्यकर्ते, संघटनांचे पदाधिकारी यांचा भरणा आहे.

१. मला अद्याप न्यायालयाच्या निकालाची प्रत प्राप्त झाली नाही. मी उद्याच्या मतदानाची तयारी केली होती. मात्र संस्थेच्या अध्यक्षांनी मतदान पुढे ढकलत असल्याचे आज सकाळी जाहीर केले. – गिरीधर शेट्टी, निवडणूक निर्णय अधिकारी, एशियाटिक सोसायटी.

२. न्यायालयाने मतदार याद्या अद्यायावत करण्यास सांगितले आहे. त्यामुळे सभासद छाननी करण्यास काही महिन्यांचा कालावधी लागेल. त्यानंतर निवडणुकीचा निर्णय होईल. – विस्पी बालापोरिया, अध्यक्ष, एशियाटिक सोसायटी.