मुंबई : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पुरवलेल्या माहितीच्या आधारे इंदोर पोलिसांनी सरफराज मेमनला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) पोलीस मध्य प्रदेशात गेले आहेत. मुंबई पोलीस व इतर यंत्रणांनाही याबाबत माहिती पुरवण्यात आली होती.
हेही वाचा – ‘बॉम्बे’चे मुंबईनंतर तीन दशकाने राज्यातील शहरांचे नामांतर
चीन, हाँगहाँग, पाकिस्तान येथे प्रशिक्षण घेऊन आलेला हस्तक मुंबईत आल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) मुंबई पोलिसांना कळवण्यात आले होते. सरफराज मेमन हा संशयित मुंबईत पोहोचल्याची माहिती देण्यात आली होती. एनआयए या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सावध राहण्याबाबतचा मेल आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. सरफराज हा मध्यप्रदेशच्या इंदोरचा असल्याचे त्यात म्हटले होते. त्यामुळे मध्यप्रदेश पोलिसांनाही याबाबत कळवण्यात आले होते. ही व्यक्ती भारतासाठी धोकादायक असून त्याची ओळख पटावी यासाठी त्याचा चालक परवाना, पारपत्र, आधारकार्डची प्रत एनआयएकडून पोलिसांना ईमेलद्वारे पाठवलेली होती. या संशयित व्यक्तीचा शोध सध्या सर्वत्र सुरू असून सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. संबंधित संशयित इसम सरफराजला इंदोर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्र एटीएस इंदोरमध्ये दाखल झाली आहे. या संशयित तरुणाची महाराष्ट्र एटीएस चौकशी करणार आहे.