काळी-पिवळी रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ १ ऑक्टोबरपासून लागू होत असून या भाडेवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. बेस्ट बसमधून पाच किलोमीटरपर्यंत प्रवास करण्यासाठी नागरिकांना अवघे पाच रुपये मोजावे लागत आहेत. मात्र नव्या भाडेदर पत्रकानुसार दिवसा रिक्षातून पाच किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी दिवसा ७७ रुपये, तर टॅक्सीसाठी ९३ रुपये मोजावे लागणार आहेत. टॅक्सी, रिक्षातून रात्री १२ नंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला खार लागणार आहे. दरम्यान, नवीन भाडेदर लागू करताना मीटरमध्ये बदल करावे लागणार (रिकेलिब्रेशन) असून हे बदल होईपर्यंत चालकांना नवीन भाडे दरपत्रक दिले जाईल. यावर क्यूआर कोड स्कॅन केल्यास परिवहन विभागाने आकारलेले अधिकृत दरपत्रक पाहता येईल. त्यामुळे प्रवाशाची फसवणूक होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा- मुंबईतील बस थांब्यांवर लवकरच मोबाइल चार्जिंग, वायफाय सुविधा; वर्षभरात १,५६० बस थांब्यांचे नूतनीकरण व पुनर्बांधणी करणार

सीएनजीचे दर वाढल्याने रिक्षा-टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. त्यासाठी संपाचा इशाराही देण्यात आला होता. अखेर परिवहन विभागाने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. रिक्षाच्या भाड्यात पहिल्या दीड किलोमीटरसाठी दोन रुपये, टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे रिक्षाचे भाडे १ ऑक्टोबरपासून २१ रुपयांवरून २३ रुपये, टॅक्सीचे भाडे २५ रुपयांवरून २८ रुपये होणार आहे. रिक्षातून रात्री १२ नंतर दीड किलोमीटर प्रवास करण्यासाठी २७ रुपयांऐवजी २९ रुपये आणि टॅक्सीसाठी ३२ रुपयांऐवजी ३५ रुपये आकारण्यात येणार आहेत.

हेही वाचा- विश्लेषण : मुंबईतील स्थलांतरित प्रवाळ वाचणार का? त्यांचे महत्त्व काय?

रिक्षामधून दिवसा पाच किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी ७१ रुपयांऐवजी ७७ रुपये आणि रात्री १२ नंतर पाच किलोमीटर प्रवासासाठी ८९ रुपयांऐवजी थेट ९६ रुपये मोजावे लगाणार आहेत. तर दिवसा दहा किलोमीटर प्रवासासाठी १४२ रुपयांऐवजी १५३ रुपये मोजावे लागतील. काळ्या-पिवळ्या टॅक्सीचा प्रवासही महागडा ठरणार आहे. पाच किलोमीटरपर्यंत ८५ रुपयांऐवजी ९३ रुपये आणि रात्री १२ नंतर पाच किलोमीटरसाठी १०६ रुपयांऐवजी ११७ रुपये मोजावे लागतील, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सध्या बेस्टच्या साध्या बसमधून पाच किलोमीटरपर्यतच्या प्रवासासाठी पाच रुपये आणि वातानुकूलित बसमधून प्रवास करण्यासाठी सहा रुपये तिकीट दर आकारण्यात येत आहेत. त्यामुळे रिक्षा-टॅक्सीपेक्षा बेस्टता प्रवास स्वस्त ठरणारा आहे. बेस्टने भाडेदरात कपात केल्यानंतर हळूहळू प्रवासी संख्या वाढत गेली. त्यामुळे मुंबईत रिक्षा-टॅक्सीच्या प्रवासी संख्येवर परिणाम झाला. करोनाकाळात रिक्षा-टॅक्सी चालकांना प्रवासीही मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक गणित बिघडले होते.

हेही वाचा- धारावी पुनर्विकासात अपात्र रहिवाशांनाही घरे; चार चटई क्षेत्र निर्देशांकाचा वापर

टॅक्सीने प्रवास करायचा की नाही…

बेस्टचे भाडे परवडणारे आहे. बेस्टचा वातानुकूलित प्रवासही स्वस्त आहे. त्यातुलनेत रिक्षा-टॅक्सी प्रवास खूपच महागडा आहे. त्यामुळे ऑक्टोबरपासून रिक्षा, टॅक्सीने प्रवास करायचा की नाही असा प्रश्न पडला आहे, असे मत दादरमधील रहिवासी छाया कदम यांनी व्यक्त केले.