मुंबई : अयोध्येत २२ जानेवारी रोजी होत असलेल्या राम मंदिर लोकार्पण आणि श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळयानिमित्ताने भाजपने राज्यभरात जल्लोषासाठी जोरदार तयारी केली आहे. प्रत्येक शहरात आणि ग्रामीण भागातही मंदिरांमध्ये त्याचबरोबर अन्यत्रही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यात महायज्ञ, प्रवचने, गीतरामायण, भजन, अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिकृतीचे सादरीकरण असे विविध कार्यक्रम होत आहेत.

राम मंदिरात दर्शनासाठी जाण्याकरिता घरोघरी आमंत्रण देण्याचा उपक्रम गेले काही दिवस सुरू असून अयोध्येहून आलेल्या अक्षतांचे वाटप भाजप, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अन्य कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे आदी ठिकाणी श्रीरामाचे कटआऊट असलेले रथ सजविण्यात आले असून ते शहरांमध्ये फिरून कार्यक्रमाचे आमंत्रण देत वातावरणनिर्मिती करीत आहेत.

हेही वाचा >>> महिला वर्गाला गुलाबी रिक्षांच्या वाटपासाठी लोकप्रतिनिधींचा आग्रह

गिरगाव येथील लोकमान्य टिळक उद्यान नामकरण सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता आणि येथे श्रीरामाच्या जीवनावर आधारित ध्वनिप्रकाश शो प्रदर्शित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, शहर पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार प्रवीण दरेकर आदींच्या उपस्थितीत त्याचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई भाजप आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांच्या पुढाकाराने दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान गणेश मंदिराजवळ ४५ फूट भव्य श्रीरामाची मूर्ती आणि मंदिराची उभारणी करण्यात आली असून तेथे नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे. 

राज्यात २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर

करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार अतुल भातखळकर व इतरांनी केली असून त्याबाबत एक-दोन दिवसांत निर्णय अपेक्षित आहे.

दीपोत्सव, रोषणाई, संगीत..

* भाजपच्या प्रदेश कार्यालयापुढे श्रीरामाचा भव्य कटआऊट आणि अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

* मुंबई भाजपने लक्षावधी दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

* भाजप नेते अतुल शहा यांच्या पुढाकाराने प्रभू रामचंद्रांवरील दोन मराठी व हिंदी गाण्यांचे प्रसारण फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. कवी मोहन कामत असून संगीतकार दत्ता थिटे व गायक डॉ. राहुल जोशी, मोना कामत, रिंकू गिरी हे या वेळी उपस्थित होते.

* भाजपचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांनी राम मंदिर लोकार्पणानिमित्ताने छोटया डायऱ्यांचे वाटप सुरू केले आहे.

* भाजप आमदार, खासदार आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने बहुसंख्य विभागात मिरवणुका, रामनाम जप, रांगोळया, दीपोत्सव आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन राज्यभरात करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* २२ जानेवारीला राज्यभरात दिवाळीप्रमाणे जल्लोष, दीपोत्सव, रोषणाई, फटाके, मिठाईवाटप आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी विभागस्तरावर कार्यकर्त्यांच्या बैठका होत आहेत. * मूर्तिकारांकडे श्रीराममूर्ती आणि दुकानांमधून रामाच्या छायाचित्रांची मागणी प्रचंड वाढली आहे.