मनसे नेते बाळा नांदगावकर हे तब्बल २४ वर्षानंतर शिवसेना भवनात पोहोचले. पत्रकार परिषदेच्या निमित्ताने बाळा नांदगावकर २४ वर्षांनी शिवसेना भवनात पोहचले. या निमित्ताने बाळा नांदगावकर यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील आठवणींना उजाळा मिळाला. ऐन दिवाळीच्या सणात दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षातील आठवणींनी त्यांचा कंठ दाटून आला होता. यावेळी, शिवसेना भवनाच्या आणि बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत डोळ्यातून अश्रू आले. शिवसेना भवनमध्ये येताच, त्यांनी पायरीवरच डोकं टेकवत दर्शन घेतलं. तसंच, दोन भाऊसुद्धा शिवसेना भवनात आपल्याला एकत्र पाहायला मिळतील, असंही नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले बाळा नांदगावकर?
मुंबई महापालिका आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. तब्बल २२ वर्षानंतर उद्वव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरुन एकत्र आल्याचं महाराष्ट्राने पाहिलं. त्यानंतर, ठाकरे बंधूंमधील दुरावा कमी झाला असून सातत्याने भेटीगाठी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या मनसेच्या दीपोत्सव २०२५ कार्यक्रमाचे उद्घाटनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. त्यामुळे, या दोन प्रमुख नेत्यांसह कार्यकर्तेही एकत्र आले आहेत. त्यातच, मी दोन भावांना एकत्र आणणार हा शब्द बाळासाहेबांना दिलाय, असे म्हणत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली होती. आता, त्यांचे ते शब्द लवकरच खरे ठरत असल्याचं दिसून येत आहे. कारण, आज दादर येथील सेना भवनात आल्यानंतर पुन्हा एकदा बाळा नांदगावकर यांना अश्रू अनावर झाले होते. तसेच, दादर भवनात लवकरच दोन्ही भाऊ एकत्र येतील, असेही यावेळी बाळा नांदगावकर यांनी म्हटलं. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बाळा नांदगावकर यांनी ही प्रतिक्रिया दिली.
या वास्तूच्या अनेक आठवणी आहेत-नांदगावकर
बाळा नांदगावकर पुढे म्हणाले, सेना भवनाच्या अनेक आठवणी आहेत, राजकारणाचे धडे या वास्तूत आम्ही घेतले आणि त्यामुळे मी पायरीच्या पाया पडलो आणि आतमध्ये प्रवेश केला. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या अनेक आठवणी सेना भवनात आहेत आणि त्यामुळे मी भावनिक झालो. दोन भाऊ एकत्र यावे, यासाठी मी प्रयत्न करत होतो आणि प्रत्येकवेळा ते बोलायचो. त्यामुळे, दीपोत्सवावेळेस दोन भाऊ एकत्र आले आणि त्या दोघांनी मला पुष्पगुच्छ दिला, असे सांगताना बाळा नांदगावकर भावूक झाले होते. आज सेना भवनांमध्ये पुन्हा एकदा मला पत्रकार परिषदेसाठी स्वतः राज ठाकरे यांनी जायला सांगितलं. त्यामुळे आम्ही सगळे नेते सेना भवनात आलो. ज्याप्रमाणे मी सेना भवनात आलो तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही शिवसेना भवनात दिसतील असंही बाळा नांदगावकर म्हणाले.