मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांमध्ये मानसिक ताणतणाव वाढत असून, मानसिक आरोग्यावर अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग लवकरच राज्यभरात “बँड टू बँड थेरपी” हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्याचा विचार करीत आहे.
मानसिक आरोग्याच्या विषयावर काम करणाऱ्या “पॉवर ऑफ वर्ड्स अकॅडमी” या संस्थेच्या प्रतिनिधींसोबत मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत अलीकडच्या काळात सर्व वयोगटातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत असलेल्या ताणतणावाच्या समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
अनेकदा नागरिक व्यक्त होत नाहीत. त्यामुळे तणाव वाढतो. त्याचे मानसिक आजारात रूपांतर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांच्या भावना समजून घेऊन त्यांचे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी “बँड टू बँड थेरपी” हा पथदर्शी प्रकल्प राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. या प्रकल्पानुसार ताणतणावाने त्रस्त व्यक्तीला एक विशिष्ट प्रकारचे बँड हातावर बांधण्यासाठी देण्यात येणार आहेत. या बँडच्या माध्यमातून त्या व्यक्तीला तणावाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
आशा स्वयंसेविका आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असल्याने पहिल्या टप्प्यात त्यांना प्रशिक्षण देऊन हा प्रकल्प राबवता येईल का ? याची चाचपणी करण्यात आली. या बैठकीस पॉवर ऑफ वर्ड्स संस्थेच्या स्टेफी बाऊ, देबोरा पंडित- सवाफ गुरू सावले, विनीत जैन, डॉ. मयूर दुबे, आरोग्य सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत आदी मान्यवर उपस्थित होते.
