मुंबई : एप्रिल महिन्यात आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या वांद्रे येथील लिंक स्क्वेअर मॉलच्या इमारतीचे संरचनात्मक परीक्षण पूर्ण करण्यात आले असून अहवाल प्रतिक्षित असल्याची माहिती प्रीमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने नुकतीच उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून दिली.
माजी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या मालकीच्या वांद्रेस्थित लिंक स्क्वेअर मॉलच्या तळघरात क्रोमा शोरूममध्ये २९ एप्रिल रोजी आग लागली होती. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीत दोन टेरेस रेस्टॉरंट्स आणि २०० हून अधिक दुकाने जळून खाक झाली होती. मुंबई अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी २२ तास लागले होते.
चायना गेट ग्रुपचे रेस्टॉरंट्स, टीएपी रेस्टो बार आणि ग्लोबल फ्यूजनचे आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. चायनागेट रेस्टॉरंट्स प्रायव्हेट लिमिटेडने न्यायालयात धाव घेऊन आगीमुळे निर्माण झालेला राडा-रोडा हटविण्याचे, या इमारतीचे संरचनात्मक परीक्षण करण्याचे आदेश महापालिका प्रशासन आणि सोसायटीला देण्याची मागणी केली होती.
इमारतीचे संरचानात्मक परीक्षण पूर्ण करावेच लागेल आणि संरचना पुनर्संचयित करावी लागेल. त्यानंतर, महानगरपालिकेला, त्यांच्या संबंधित विभागाद्वारे, तसेच अग्निशमन विभागाद्वारे, परिसराची तपासणी करावी आणि प्रतिवादी सोसायटीच्या जागेला आवश्यक मान्यता अथवा परवानगी द्यावी, असे आदेश न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने दिले आणि याचिका निकाली काढली.
तत्पूर्वी, इमारतीचे संरचनात्मक परीक्षण करण्यात कोणताही अडथळा आला नाही. विशेषतः २९ एप्रिल २०२५ रोजी लागलेल्या आगीनंतर सोसायटीने २० जून रोजी इमारतीचे संरचनात्मक परीक्षण करण्यासाठी माहिमतुरा कन्सलटन्स प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती केली आहे. संरचनात्मक परीक्षण पूर्ण झाले असून अहवालाची प्रतिक्षा असल्याची माहिती सोसायटीतर्फे न्यायालयाला देण्यात आली.
तसेच, सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाची नियुक्ती करून याचिकाकर्त्यांनी केलेल्या संरचनात्मक परीक्षणावर आपल्याला कोणताही आक्षेप नसल्याचेही सोसायटीच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. याचिकाकर्त्यांनी ३ जुलै रोजी महाविद्यालयाकडून संरचनात्मक परीक्षण करण्याची मागणी केली होती आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना परवानगी देण्यात आली होती. या निर्णयानंतर, सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाने इमारतीचे संरचनात्मक परीक्षण सुरू केल्याचेही सोसायटीने प्रतिज्ञापत्रात म्हटले.