मुंबई : टॅक्सीच्या प्रतिक्षेत रस्त्याच्या शेजारी उभी असलेली महिला व तिच्या मुलाला बेस्ट बसने चिरडल्याचा प्रकार वडाळा परिसरात घडला. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी बस चालकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. बसचा ब्रेक नादुरूस्त झाल्यामुळे नियंत्रण सुटल्याचे आरोपी चालकाने चौकशीत सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतले असून त्याला नोटीस देऊन सोडण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

युलोजियस सेल्वराज (२७) ही महिला वडाळा टीटी येथील हिम्मत नगर येथे वास्तव्याला होती. तिचा मुलगा अॅन्टोनी सेल्वराज (७) डॉन बॉस्को शाळेत इयत्ता पहिलीत शिकत होता, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. मुसळधार पावसामुळे शाळा लवकर सोडण्यात आल्या होत्या. युलोजियस याही मुलाला शाळेतून आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी दुपारी साडेतीन वाजता वडाळ्यातील सेंट जोसेफ शाळेजवळ पेन्सिल बस स्टॉपसमोर दुर्दैवी घटना घडली. महिला वडाळा टीटी येथील घरी जाण्यासाठी टॅक्सीच्या प्रतिक्षेत रस्त्याच्या शेजारी उभी होती. त्यावेळी बेस्टच्या बसने (मार्ग क्रमांक १७४, दादर ते वडाळ) महिला व तिच्या मुलाला चिरडले.

अपघात झाला त्यावेळी मुलगा मागच्या चाकाखाली सापडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह परळ येथील केईएम रुग्णालयात नेण्यात आला आहे. तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या युलोजियस यांना तातडीने शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान रात्री आठच्या सुमारास महिलेचाही मृत्यू झाल्याचे उपायुक्त(परिमंडळ-४) रागसुधा आर. यांनी सांगितले. अपघाताच्या वेळी महिलेची दोन मुले सेलीना (१२) आणि सागायेम (५) तिच्यासोबत चालत होती. मात्र अपघातात ती थोडक्यात बचावले. महिलेला चार मुले होती.

याप्रकरणी बस चालक बाबू शिवाजी नागेनपेणे (४०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. तो गोवंडी येथील रहिवासी आहे. प्राथमिक चौकशीत बसचा ब्रेक नादुरूस्त झाल्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटल्याचे त्याने सांगितले आहे. त्याची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यासाठी बसची तपासणी करून त्याबाबतचा अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. चालकाची वैद्कीय तपासणी करण्यात आली असून त्याने मद्यप्राशन केले नसल्याचे निष्पन्न झाले आहे. पण आई व मुलाच्या मृत्यूने स्थानिक परिसरात शोककळा पसरली असून मुसळधार पावसाच्या काळात रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.