मुंबई : मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीला अधिक चालना देण्यासाठी, प्रवाशांचा प्रवास वेळेत, परवडणारा आणि आरामदायी होण्यासाठी बेस्ट उपक्रमाने नवीन वातानुकूलित बस मार्ग ए-८४ सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही नवीन बस सेवा रविवार, ७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.

डाॅ. श्यामा प्रसाद मुखर्जी चौक ते ओशिवरा बस आगारादरम्यानची ही सेवा स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी मार्गावरून (कोस्टल रोड) धावणार आहे. खासगी ॲप आधारित टॅक्सीमधून डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी चौकातून ओशिवरा बस आगारापर्यंत जाण्यासाठी सुमारे ५०० ते ७०० रूपये मोजावे लागत आहेत. तर गर्दीच्या वेळी ७०० हून रुपये द्यावे लागतात. मात्र, बेस्टच्या ‘ए-८४‘ बसमधून प्रवाशांना हाच प्रवास केवळ ५० रुपयांत करता येणार आहे.

नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या बस मार्ग ए-८४ हा दक्षिण आणि पश्चिम मुंबईतील प्रमुख भागांना सागरी किगारी मार्गाने जोडल्याने प्रवाशांचा प्रवास कालावधी कमी झाला होईल. ही बस डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (संग्राहालय), अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट स्थानक), स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड), वरळी सी फेस, वरळी आगार, बाबासाहेब वरळीकर चौक, महापौर बंगला (शिवाजी पार्क), माहीम, खार स्थानक रोड (पश्चिम), सांताक्रूझ आगार, विर्लेपार्ले, अंधेरी स्थानक (पश्चिम), ओशिवरा पूल, ओशिवरा आगार यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांहून प्रवास करेल. दैनंदिन प्रवाशांना आणि पर्यटकांची गरज लक्षात घेऊन हा मार्ग तयार करण्यात आला आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.

बसची वेळ कितीची असेल

ओशिवरा बस आगारातून पहिली बस सकाळी ७.१५ वाजता, तर शेवटची बस सायंकाळी ५.२० वाजता सुटेल. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी चौक (संग्रहालय) येथून पहिली बस सकाळी ८:५० वाजता सुटेल आणि शेवटची बस सायंकाळी ७.१५ वाजता सुटेल. या मार्गावरील बस दिवसभर अंदाजे ४० ते ४५ मिनिटांच्या नियमित अंतराने धावतील. त्यामुळे प्रवाशांना सतत उपलब्धता आणि कमीत कमी वाट पाहण्याचा वेळ मिळेल. प्रवाशांनी या बस सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात आले आहे.

प्रवाशांना परवडणारी भाडे रचना

या प्रवासाचे किमान भाडे १५ रुपये आणि कमाल भाडे ५० रुपये आहे. ज्यामुळे प्रवाशांना ही सेवा परवडणारी असेल. ही सेवा आठवड्याच्या सातही दिवस कार्यरत असेल.

पर्यटक, प्रवाशांना प्रवासाचा आनंद मिळणार

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात नवीन वातानुकूलित बसगाड्यांचा टप्याटप्याने समावेश करण्यात येत आहे. त्यापैकी काही बसगाड्या उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. नव्याने विकसित केलेल्या सागरी किनारी मार्गावरून बस सेवा चालविण्यात आल्याने, प्रवाशांना आणि पर्यटकांना एक वेगळा अनुभव घेता येईल, असे बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्याने सांगितले.