मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी व बेस्ट उपक्रम वाचवण्यासाठी कामगार नेते व बेस्ट वर्कर्स युनियनचे शशांक राव बेमुदत उपोषण करणार आहेत. येत्या १० नोव्हेंबरपासून ग्रॅन्टरोड येथील कार्यालयातच ते उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान, शशांक राव हे भाजपमध्ये असून राज्यात भाजपची सत्ता असताना राव यांना उपोषणाला बसावे लागत आहे.

बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत आहे. बेस्ट उपक्रम वाचवण्यासाठी विविध संघटनांनी अनेक वेळा आंदोलने केली. राज्य सरकारला पत्रव्यवहार केला. मात्र बेस्ट उपक्रमाकडे कोणीही लक्ष दिले नाही. बेस्ट उपक्रम चालवण्यासाठी कोणीही अधिकारी नियुक्तीवर येण्यास तयार नाहीत. त्यामुळे बेस्ट उपक्रमाचे आणि या उपक्रमातील कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात आहे.

कर्मचाऱ्यांना पगार मिळेल की नाही याची शाश्वती नसते, प्रवाशांना बसगाड्या वेळेवर मिळत नाहीत, सेवानिवृत्तांना त्यांची देणी मिळत नाही. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आता बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव सोमवार, १० नोव्हेंबरपासून ग्रॅन्टरोड येथील आपल्या संघटनेच्या कार्यालयातून बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत.

या आहेत मागण्या….

बेस्ट उपक्रमाने स्वमालकीच्या ३,३३७ बसगाड्या कायमस्वरूपी राखाव्यात, बेस्ट उपक्रमाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटीची थकित रक्कम त्यांना तातडीने द्यावी, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी व महापालिका समकक्ष वेतनमान याचा समावेश असलेला प्रलंबित वेतनकरार तातडीने करावा आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत. अनेकदा या मागण्यांबाबत पाठपुरावा करूनही आजतागायत कोणताही सकारात्मक निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलेला नाही. त्यामुळे हे आंदोलन करीत असल्याचे राव यांचे म्हणणे आहे.

बेस्ट उपक्रमाकडे ३० नोव्हेंबर रोजी स्वमालकीच्या फक्त २५१ बसगाड्या शिल्लक राहणार आहेत. मुंबईकर जनतेस गेल्या ७५ वर्षांहून अधिक काळापासून मिळणारी ही अत्यावश्यक सार्वजनिक वाहतूक सेवा बंद पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बेस्टची ही अत्यावश्यक सेवा अल्पदरात नियमितपणे सुरू राहणे ही प्रवासी आणि मुंबई शहराची मुलभूत गरज आहे, असे मत शशांक राव यांनी व्यक्त केले.

भाजपचीच सत्ता आणि तरीही उपोषणाची वेळ

विशेष म्हणजे शशांक राव सध्या भाजपमध्ये असून बेस्टच्या पतपेढीत त्यांचे पॅनेल निवडून आले होते. भाजपशी जवळीक असलेल्या राव यांची संघटना जिंकल्यामुळे बेस्टला चांगले दिवस येतील अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा होती.