भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन असल्याच्या निमित्ताने चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी आलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना विरोध दर्शवण्यात आला. समीर वानखेडे यांच्यासमोर घोषणाबाजी करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला. भीमशक्ती रिपब्लिकन सेनेने समीर वानखेडे यांना आत्ताच चैत्यभूमीवर यावंसं का वाटलं? असा सवाल उपस्थित करत त्यांना नैतिक अधिकार नसल्याचं म्हटलं आहे.

समीर वानखेडेंकडून चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन; बाहेर पडताना झालेल्या घोषणांमुळे वाद

भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष दगडू कांबळे यांनी समीर वानखेडेंच्या उपस्थितीवर आक्षेप नोंदवताना म्हटलं की, “समीर वानखेडेंना बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नाही. जर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचं असेल तर त्यांच्या विचारधारेवर चाललं पाहिजे. शिकलेल्या लोकांनीच मला धोका दिला आणि हाल केले असं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. समीर वानखेडेंना आजच चैत्यभूमीवर येण्याची गरज का भासली?”.

नवाब मलिकांची प्रतिक्रिया –

“बाबासाहेबांना अभिवादन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. अभिवादन करणारे एखाद्या धर्माचे, समाजाचे असं म्हणणं चुकीचं आहे. आम्ही दरवर्षी इथे येतो. काही लोकांनी येणं सुरु केलं आहे हे चांगलं आहे,” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले. “मी जो संघर्ष सुरु केला त्याचा जय भीम इम्पॅक्ट सुरु झाला आहे,” असं वाटतं असंही ते म्हणाले आहेत. समीर वानखेडे याआधी चैत्यभूमीवर आल्याचं पाहिलं का? या प्रश्नावर बोलताना त्यांना त्याबद्दल माहिती नाही, पण माझ्यासोबत नमाज पठण करायचे हे खरं आहे असा टोला लगावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं काय झालं –

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमधील चैत्यभूमीवर अभिवादन केलं जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महापौर किशोरी पेडणेकर सकाळी चैत्यभूमवीर दाखल झाले होते. यानंतर गेल्या काही काळापासून वादात असलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेदेखील चैत्यभूमीवर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. मात्र यावेळी तेथून बाहेर जात असताना त्यांच्या विरोधात आणि समर्थनार्थ घोषणाबाजी झाल्याने वाद निर्माण झाला.