एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागून त्याच्यावर हल्ला करून लुटल्याची घटना वसईत घडली आहे. या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विरार पश्चिमेच्या राजोडी गावात राहणारे ऑल्वीन रॉड्रिंक्स शनिवारी रात्री १० च्या सुसारास होळी दिघा येथे दुचाकीवरून जात होते. निर्मळ येथे त्यांच्याकडे एका अनोळखी व्यक्तीने लिफ्ट मागितली. रॉड्रीक्स यांनी त्या व्यक्तीला दुचाकीवर मागे बसवले. मात्र काही अंतर पुढे जाताच भुईगाव दत्त डोंगरीजवळ त्या व्यक्तीने दुचाकी थांबविण्यास सांगितले. त्याचेवळी तिथे दबा धरून थांबलेल्या त्याच्या साथीदारांनी रॉड्रिंक्स यांची दुचाकी अडवली.
त्या सर्वांनी मिळून रॉड्रीक्स यांच्यावर धारदार शस्त्राने डोक्यावर व मानेवर तीन वार केले. आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, अंगठ्या व खिशातील दहा हजार रुपयांची रोकड लुटून पळ काढला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रॉड्रिंक्स यांच्यावर सध्या वसईच्या कार्डिनल ग्रेशस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांना पकडण्यासाठी आम्ही तीन पथके तयार केली आहेत, अशी माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण कर्पे यांनी दिली.
