मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हिंदू देवदेवता आणि महापुरुषांविरोधात वारंवार अवमानास्पद वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप करत भाजपने शनिवारी ‘माफी मांगो’ आंदोलनाची हाक दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळावरून वाद निर्माण केल्याच्या निषेधार्थ मुंबईसह राज्याच्या विविध भागांत आंदोलन केले जाणार आहे. देवदेवतांचा अपमान करणाऱ्या सर्वानी जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे. मुंबईतील आंदोलनात भाजप खासदार, आमदार आणि अन्य नेते सहभागी होणार असल्याचे अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी  प्रभू श्रीरामचंद्र व श्रीकृष्णांचा उपमर्द केला असून संत ज्ञानेश्वर, एकनाथ यांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न करुन वारकरी संप्रदायाचाही अपमान केला आहे. त्यामुळे जनक्षोभ निर्माण झाला आहे.

महामोर्चा विरुद्ध माफी मांगो! मुंबईत मविआच्या मोर्चावेळीच भाजपचेही आंदोलन, ठाण्यात बंदची हाक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला, यावरुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात येत असून त्यामुळे आंबेडकरप्रेमींच्या मनात यामुळे प्रश्न निर्माण झाले आहेत. याविरोधात मुंबईत कांदिवली रेल्वेस्थानक, अंधेरी पूर्व रेल्वेस्थानक, घाटकोपर पूर्व, दादर पूर्व रेल्वेस्थानक, भाजप प्रदेश कार्यालयाजवळ, स्वा. सावरकर पुतळा, विलेपार्ले या ठिकाणी भाजप कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि अन्यत्रही भाजप कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करत आंदोलन केले जाणार आहे.