देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. दरम्यान करोनाची तिसरी लाट देखील येणार असल्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे यापुर्वी देशात लसीकरण महत्वाचे आहे. मात्र लशीच्या तुचवड्यामुळे लसीकरणाचा गोंधळ उडाला आहे. लस नसल्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद पडले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका करत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

अतुल भातखळकर म्हणाले, “काँग्रेस नेते भाई जगताप लशींच्या मुद्यावर आंदोलन करत आहेत. सर्व बड्या रुग्णालयात लशी उपलब्ध आहेत, फक्त राज्य सरकारला मिळत नाहीत. १ मे पासून राज्यांना लस खरेदीची मुभा असताना लस खरेदी का झाली नाही, याचे उत्तर त्यांनी द्यावे. रुग्णालयाचा धंदा चालावा म्हणून ही दिरंगाई होतेय का?”

अतुल भातखळकर यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर देखील निशाणा साधला. “मंत्री बाळासाहेब थोरात आपल्या कारखान्यातील मजुरांच्या पगारातून लशीचे पैसे कापत आहेत. पण केंद्राने लशी फुकट द्याव्या, अशी त्यांची मागणी आहे. काँग्रेसचे तुच्छ चारित्र्य दाखवणारा हा प्रकार आहे. काँग्रेसवाल्यांचा निलाजरेपणा पाहा”, असे ट्वीट भातखळकर यांनी केले आहे.

 

लसखरेदी लांबणीवर

लस उपलब्ध होत नसल्याने मुंबई महापालिकेप्रमाणे नवी मुंबई महापालिकेनेही लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काढलेल्या जागतिक निविदांना मुदतवाढ देऊनही काहीही प्रतिसाद मिळाला नाही. मुंबई पालिकेच्या निविदांना तरी काही कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे लस खरेदी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पालिकेने दुसरी मुदतवाढ दिली आहे.

डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण

देशात आत्तापर्यंत तीन टक्के लसीकरण झाले असले तरी, करोना प्रतिबंधक लशींच्या २१६ कोटी मात्रा डिसेंबरपर्यंत दिल्या जातील, म्हणजेच १०८ कोटी नागरिकांचे लसीकरण पुढील सहा महिन्यांमध्ये पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी दिली.

मोदी सरकारकडे लसीकरणाचे धोरण नसल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केल्यानंतर त्यांना उत्तर देताना जावडेकर म्हणाले, ‘‘लसीकरणाची खरोखरच चिंता असेल तर, काँग्रेसप्रणीत राज्यांमध्ये काय चालले आहे ते बघा. १८ ते ४४ वयोगटासाठी केंद्राने लसमात्रांचा दिलेला कोटादेखील या राज्यांनी उचललेला नाही.’’