BJP on Amit Thackeray: माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेने अमित ठाकरेंची उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपाने त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. तसेच शिवसेना (शिंदे) पक्षाने आपला उमेदवार देऊ नये, असे आवाहन केले होते. मात्र तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला उमेदवार दिला आणि महायुतीमध्ये काहीशी वादाची ठिणगी पडली. त्यानंतर भाजपाने आमचा पाठिंबा महायुतीच्या उमेदवाराला असल्याचे जाहीर केले. मात्र आज मतदानाच्या दिवशी भाजपाचे पदाधिकारी अमित ठाकरेंच्या पाठिशी उभे राहिलेले पाहायला मिळाले.

भाजपाच्या माहीम विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांनी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलत असताना अमित ठाकरे यांना पाठिंबा दिला असल्याचे म्हटले. “आम्ही महायुतीबरोबरच आहोत. पण माहीम विधानसभेत आम्ही राज ठाकरेंच्या पाठिशी आहोत. आमची विचारधारा एक आहे. मनसेचे कट्टर हिंदुत्व आणि भाजपाचे कट्टर हिंदुत्व हे एकसारखेच आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आपुलकी वाटते. तसेच त्यांनी लोकसभेला आम्हाला मदत केली. त्यामुळे मैत्रीचा धर्म आम्ही निभावत आहोत”, असे अक्षता तेंडुलकर म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्षता तेंडुलकर यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचे कारण सांगत असताना मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांची यादीही सांगितली. मतदारसंघात पुनर्वसनाची कामे प्रलंबित आहेत. या प्रश्नात विद्यमान आमदार लक्ष घालत नसल्याचे त्या म्हणाल्या. लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे, असे आम्हाला वाटले, असे अक्षता तेंडुलकर म्हणाल्या.