मुंबई : नाल्यातून गाळ काढण्याच्या कामात फसवेगिरी करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतल आहे. गाळ उपसा कामात हलगर्जीपणा करून महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारांवरांना दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. गाळ वाहून नेताना केलेल्या घोटाळाप्रकरणातील फेरीचे पैसे कंत्राटदारांना देण्यात येणार नाहीत. त्यामुळे या कंत्राटदारांना १३ कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागणार आहे. विशेष म्हणजे कंत्राटदारांची ही चलाखी एआय तंत्रज्ञानाने शोधून काढली आहे.

पावसाळ्यात मुंबईत पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. नालेसफाईच्या कामात कंत्राटदारांना कोणतीही चलाखी करता येऊ नये म्हणून यंदा मुंबई महापालिकेने एआय तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. मात्र तरीही नाल्यातून गाळ काढून वाहून नेण्यात कंत्राटदारांनी चलाखी केल्याचे उघड झाले आहे. यंदा नालेसफाईत कंत्राटदारांनी घोटाळा केल्याचा आरोप पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केला होता. त्यातच आता एआय तंत्रज्ञानानेही नालेसफाईत पालिका प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या कंत्राटदाराो पितळ उघडे पडले आहे. कंत्राटदारांची चलाखी एआय तंत्रज्ञानाने शोधून काढली असून या चलाखीच्या आधारे पालिका प्रशासनाने या कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे.

१३ कोटी वाचवले

गाळ वाहून नेण्याच्या फेऱ्यांचे चित्रीकरण करण्याचे आदेश देण्यात आले होते. गाळ काढताना, भरताना आणि विल्हेवाट लावतानाच्या ध्वनिचित्रफिती काढणे बंधनकारक करण्यात आले होते. या चित्रफिती तपासताना ही चलाखी उघड झाली. अशी चलाखी करणाऱ्या कंत्राटदारांना त्या त्या फेरीच्या देयकाचे अधिदान केले जाणार नाही. सर्वच कंत्राटदारांवर अशी कारवाई करण्यात आली असून ही रक्कम सुमारे १३ कोटींची आहे.अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त

कोणत्या प्रकारची चलाखी

गाळाचे प्रमाण कमी – जास्त दाखवणे, गाळामध्ये राडारोडा भरणे अशा प्रकारचे हे फेरफार आहेत. तसेच जुनीच ध्वनिचित्रफित अपलोड करणे. गाडी भरतानाची छायाचित्रे आणि रिकाम्या गाडीचे छायाचित्र अपलोड करतानाच्या वेळेत अतिशय कमी अंतर असणे अशी चलाखी कंत्राटदारांनी केली आहे.

यापूर्वीही कारवाई

गाळ उपसा कामात हलगर्जीपणा करून महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी यापूर्वीही एका कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत (Black List) टाकण्यात आले आहे. तसेच, त्याची महानगरपालिकेतील अभियांत्रिकीविषयक नोंदणी रद्द करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२३ कंत्राटदार, २३८ कोटींची कंत्राटे यावर्षी नालेसफाईतून गाळ काढण्यासाठी लहान नाले, मोठे नाले व रस्त्याच्या कडेची गटारे यामधील गाळ काढण्यासाठी तब्बल २३ कंत्राटदार नेमण्यात आले होते. तसेच एकूण २३८ कोटींची कंत्राटे देण्यात आली आहेत.