मुंबई : नैसर्गिक जलस्रोतातील प्रदूषण रोखण्यासाठी यंदा ६ फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. महापालिकेने कृत्रिम तलावातून सुमारे २१०० टन मूर्तींचे अवशेष गोळा केले असून लवकरच त्यावर पुनर्प्रक्रिया केली जाणार आहे. न्यायालय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एकमताने या अवशेषांच्या पुनर्प्रक्रियेसाठी नेमके कोणते तंत्रज्ञान वापरायचे, याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच, पुनर्प्रक्रियेसाठी विविध संस्थांचीही मदत घेण्याचा पालिकेचा मानस आहे.

यंदा गणेशोत्सवातील सहा फुटांपर्यंतच्या सर्व गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. तसेच, सहा फुटांवरील गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्याची मुभा मंडळांना देण्यात आली होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील विविध मार्गदर्शक तत्वे ठरवून दिली होती. त्यानुसार यंदा महापालिकेने ६ फुटांखालील गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्यास मज्जाव केला होता. दरम्यान, अनेक भाविकांनी ६ फुटांखालील पर्यावरणपूरक मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने विसर्जनाबाबतचा पूर्वीचा आदेश ४ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत कायम ठेवला.

यंदा गणेशोत्सवात एकूण १ लाख ९७ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. त्यात १ लाख ८१ लाख ३७५ घरगुती, तर १० हजार १४८ सार्वजनिक गणेशमूर्तींचा समावेश होता. तसेच, कृत्रिम तलावात विसर्जित केलेल्या मूर्तींवर पुनर्प्रक्रिया करण्याचा निर्णय पालिकेने पूर्वीच घेतला होता. त्यासाठी प्रमाणित कार्यपद्धतीही (एसओपी) निश्चित करण्यात आली होती. यंदा कृत्रिम तलावात विसर्जित केलेल्या मूर्तींचे मिळून एकूण २१०० मेट्रिक टन वजनाचे अवशेष महापालिकेने जमा केले. विर्सजित केलेल्या मूर्तींचे अवशेष पुनर्प्रक्रियेसाठी ठरवून दिलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचविण्यात आले आहेत. त्यासाठी ४०० हून अधिक वाहनांचा वापर करण्यात आला. तसेच, रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत १९८२ मेट्रिक टन मूर्तींचे अवशेष पालिकेकेने जमा केले होते.

यापूर्वी डायघर (शिळफाटा) हे ठिकाण पुनर्प्रक्रियेसाठी निश्चित करण्यात आले होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे ठिकाण बदलण्यात आले आहे. तसेच, मूर्तींवर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरायचे, हे अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. न्यायालय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी चर्चा करून संगनमताने पुढील प्रक्रियेबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. यासाठी विविध संस्थांचीही मदत घेण्याचा महापालिकेचा मानस असून पुनर्प्रक्रियेबाबत पद्धती सुचविण्यासाठी ९ ते १० संस्थांना मेल करण्यात आल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.