मुंबई: अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आऱोग्य केंद्रासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियुक्तीची प्रक्रिया पालिकेने सुरू केली असून सध्या नेत्र आणि कान, नाक, घसा तज्ज्ञांची निवड करण्यात येणार आहे. या सेवा लवकरच सुरू होणार आहेत.

घराशेजारीच प्रतिबंधात्मक आणि प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशातून शहरामध्ये २०० हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आऱोग्य केंद्रे सुरू करण्याचे पालिकेने अर्थसंकल्पामध्ये जाहीर केले होते. त्याची अंमलबजावणी फेब्रुवारीपासून सुरू झाली असून जून महिना संपत आला तरी अद्याप ही केंद्रे सुरू झालेली नाहीत.

सुरूवातीच्या टप्प्यांत शहरात १३ आरोग्य केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. ही सर्व केंद्रे सध्या सुरू असलेल्या दवाखान्यांचा दर्जा सुधारून तेथेच सुरू होणार आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी पालिकेच्या मुख्य रुग्णालयांपर्यत जावे लागू नये आणि मुख्य रुग्णालयांवरील रुग्णांचा भार कमी होण्यासाठी या केंद्रांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आठवड्यातून काही दिवस किंवा काही तास हे तज्ज्ञ बाह्यरुग्ण विभागात कार्यरत राहतील.

पहिल्या टप्प्यात नेत्र आणि कान,नाक,घसा या तज्ज्ञांची नियुक्ती करण्यासाठी पालिकेने अर्ज मागविले आहेत. एक वर्षाच्या करारावर या डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जनरल फिजिशियन, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, फिजियोथेरपी, त्वचारोगतज्ज्ञ या तज्ज्ञांनी यामध्ये अर्ज करावेत. केंद्रामध्ये येणाऱ्या रुग्णांनुसार या डॉक्टरांची नियुक्तीही टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.

अर्ज कऱणाऱ्या डॉक्टरांनी त्या विषयामध्ये पदव्युत्तर किंवा पदविका प्राप्त केलेली असावी. तसेच किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. या डॉक्टरांची सेवा पुरविण्यासाठी करण्यासाठी कंपनी किंवा संस्थादेखील अर्ज करू शकतील

रुग्णानुसार मानधन

केंद्रामध्ये दिलेल्या सेवेनुसार डॉक्टरांना मानधन देण्यात येईल. केंद्राच्या आवश्यकतेनुसार केंद्रामधील कामाचे तास किंवा दिवस ठरविण्यात येईल. प्रत्येक डॉक्टरांना दोन तासांसाठी किमान दीड हजार रुपये मानधन दिले जाईल. पहिल्या पाच रुग्णानंतर प्रत्येक रुग्णामागे २५० रुपये मानधन असेल. दिवसाला जास्तीत जास्त ४ हजार रुपये मानधन देण्यात येईल. एका केंद्रामध्ये किमान दोन तासांची सेवा देणे बंधनकारक असेल. केंद्रामधील बाह्यरुग्ण विभाग सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वेळेत सुरु असेल. डॉक्टरांना त्यांच्या सोईने वेळा निवडण्याचे स्वातंत्र्य असेल.

बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रासाठी निवडलेले दवाखाने

विभाग …………….दवाखाना

ए ………….कुलाबा दवाखाना

जी दक्षिण……कुंभारवाडा दवाखाना,धारावी

एच पश्चिम………गुरुनानक (आंबेडकर) दवाखाना, खार (पश्चिम)

के पश्चिम……….बनाना लीफ दवाखाना, अंधेरी(पश्चिम)

के पश्चिम………..जुहू जालन दवाखाना,  जुहू

पी उत्तर …………राठोडी दवाखाना, मालाड (पश्चिम)

आर दक्षिण…….शैलजा विजय गिरकर दवाखाना, कांदिवली(पश्चिम)

आर मध्य………………काजूपाडा दवाखाना, बोरीवली(पूर्व)

एम पूर्व……..आणिक नगर दवाखाना, वाशी नाका, चेंबूर

आर उत्तर……..आनंद नगर दवाखाना, आनंदनगर दहिसर(पश्चिम)

एन ………………साईनाथ दवाखाना, गणेश मैदान, घाटकोपर

एस ……………….टागोर नगर दवाखाना, गांधीनगर, पवई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टी………………डीडीयू मार्ग दवाखाना, चेकनाका, मुलुंड(पश्चिम)