मुंबई : मातृभाषेचा अभिमान आणि इंग्रजी भाषा आत्मसात करणे या दोन्ही गोष्टी निराळ्या आहेत. अनेक वेळा वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकजण या गोष्टींची गल्लत करतात. तसेच, बऱ्याच वेळेला इंग्रजीची भीती वाटते म्हणून आपल्याला मातृभाषेचा अभिमान वाटतो, असे महापालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांनी सांगितले.
डिजिटल जगात इंग्रजीला पर्याय नाही, हे मुलांना माहीत आहे. इंग्रजी ही ज्ञानाची खिडकी आहे. ती उघडली तर जगातील वेगवेगळे ज्ञान उपलब्ध होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबई महानगरपालिकेने ‘पहला अक्षर फाऊंडेशन’सोबत पाच वर्षांसाठी करार केला होता. या कराराची मुदत वाढविण्यात आली असून त्या निमित्ताने यशवंत नाट्य मंदिरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. त्यावेळी गगराणी बोलत होते. सर्वसाधारणपणे मूल जेव्हा जन्माला येते, त्यावेळी त्याला कुठलीही भाषा शिकवावी लागत नाही.
आपली भावंडे, आई – वडील यांच्याशी संवाद साधल्यानंतर ते मातृभाषा बोलायला लागते. आज आपण कितीही नाकारले तरी इंग्रजीला पर्याय नाही. तुम्ही मातृभाषेत कितीही पारंगत असाल तरी इंग्रजी शिकायलाच हवी, असेही गगराणी यांनी सांगितले.
इंग्रजीचा वापर करताना अनेकजण पहिल्यांदा शब्द आणि वाक्यांची मनात जुळवाजुळव करतात. त्यामुळे बोलण्यापेक्षा विचार करण्यातच अधिक वेळ निघून जातो, असेही त्यांनी नमूद केले. काही लोक अभ्यासात प्रचंड हुशार असतात. मात्र, लोकांशी कसे बोलावे, आत्मविश्वास, इंग्रजीचा वापर कसा करावा याची त्यांना जाण नसते. आपण जे इंग्रजी बोलतो ते योग्य आहे का, अन्य लोक काय विचार करतील, यातच अनेकजण गुंतून राहतात. त्यामुळे इंग्रजी बोलताना अनेकांना भीती वाटते, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, महापालिकेच्या शाळांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आता बदलत आहे. अनेक लोकप्रतिनिधी आसपासच्या मुलांना या शाळेत पाठवण्यासाठी प्रयत्न करतात. याचे श्रेय महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांना जाते, असेही त्यांनी नमूद केले. त्यावेळी उपायुक्त डॉ. प्राची जांभेकर, उपशिक्षणाधिकारी मुख्तार शहा, उपशिक्षणाधिकारी कीर्तिवर्शन कीरतकुडवे, उपशिक्षणाधिकारी ज्योती बकाने आदी उपस्थित होते.
गेल्या पाच वर्षांपासून ‘पहला अक्षर फाऊंडेशन’ महानगरपालिकेशी जोडले गेले असून या फाऊंडेशनतर्फे महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांना अध्यापनाविषयी तसेच, इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण दिले जाते. यंदा पाच वर्षे पूर्ण झाली असून पालिकेने या कराराची मुदत आणखी पाच वर्षांनी वाढविली आहे. गेल्या पाच वर्षांपासून पालिका शाळेत प्रमुख टीचर ट्रेनिंग प्रोग्राम सुरू आहे. पहला अक्षर फाऊंडेशनतर्फे ८१४ शाळांमधील १४ हजारहून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिक्षकांना फंक्शनल इंग्लिश, आधुनिक अध्यापन पद्धती आणि विद्यार्थी-केंद्रित वर्गपद्धती यांचे प्रशिक्षण दिले जात आहे.
