मुंबई : प्रमुख रुग्णालयांसह सर्व उपनगरीय रुग्णलयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे ईसीजी केवळ ईसीजी तंत्रज्ञांनीच काढावे, असे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षकांनी सर्व रुग्णालयांना दिले. मात्र यावर निमवैद्यक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेने असे निर्देश देण्यापूर्वी रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याकडे लक्ष द्यावे, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयामध्ये ईसीजी तंत्रज्ञाची अनेक पदे रिक्त आहेत. ईसीजी तंत्रज्ञ उपलब्ध नसल्यास किंवा रात्रपाळीमध्ये आपत्कालिन विभागामध्ये कार्यरत डॉक्टर व परिचारिका ईसीजी काढतात. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षकांनी काढलेल्या पत्रकात फक्त ईसीजी तंत्रज्ञांनीच ईसीजी काढावे, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होणार आहे.

अनेक उपनगरीय रुग्णालयांमध्ये फक्त एकच ईसीजी तंत्रज्ञ कार्यरत आहे. हा तंत्रज्ञ सकाळच्या पाळीमध्ये काम करतो. अनेक रुग्णालयांमध्ये ईसीजी तंत्रज्ञाची पदे रिक्त असल्याने या रुग्णालयामध्ये रुग्णांना ईसीजी बाहेरून काढण्यास सांगितले जाते. मात्र उपनगरीय रुग्णालयांच्या आपत्कालिन विभागामध्ये कार्यरत असलेले डॉक्टर व परिचारिका रात्रपाळी किंवा सुटीच्या दिवशी गंभीर स्थितीमध्ये रुग्ण आल्यास व इसीजी तंत्रज्ञ नसल्यास त्या रुग्णाचे ईसीजी काढतात.

मात्र मुंबई महानगरपालिकेने काढलेल्या परिपत्रकामध्ये रुग्णांचा ईसीजी फक्त ईसीजी तंत्रज्ञांनेच काढवे, असे स्पष्ट नमूद केले आहे. त्यामुळे यापुढे डॉक्टर व परिचारिकांकडून रुग्णांचा ईसीजी काढला जाणार नाही. याचा परिणाम रुग्ण सेवेवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एखाद्या रुग्णाचा ईसीजी वेळेत काढला नाही, तर त्याचे संपूर्ण खापर ईसीजी तंत्रज्ञावर फोडण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे म्युनिसिपल नर्सिंग ॲण्ड पॅरामेडिकल स्टाफ युनियनने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ईसीजी काढण्यासाठी तिन्ही पाळ्यांमध्ये तीन तंत्रज्ञ व सहाय्यक तंत्रज्ञ असतात. मात्र अनेक उपनगरीय रुग्णालयांमध्ये ईसीजी तंत्रज्ञ व सहाय्यक तंत्रज्ञांची पदे रिक्त आहेत. काही रुग्णालयांमध्ये फक्त तंत्रज्ञ, तर काही रुग्णालयांमध्ये सहाय्यक तंत्रज्ञ असे एकमेव पद भरलेले आहे.

पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम रुग्ण सेवेवर होतोच, त्याचबरोबरच कार्यरत तंत्रज्ञावर कामाचा अतिरिक्त भार येतो. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने प्रथम तंत्रज्ञ व सहाय्यक तंत्रज्ञ यांची रिक्त पदे भरावीत, अशी मागणी म्युनिसिपल नर्सिंग ॲण्ड पॅरामेडिकल स्टाफ युनियनच्या सहाय्यक सरचिटणीस रंजना आठवले यांनी केली आहे.