मुंबई : दिवाळी संपल्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी सर्व उमेदवारांचे आरक्षणाकडे लक्ष लागले आहे. नोव्हेंबरमध्ये आरक्षण सोडत निघेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने नुकतेच मुंबई महापालिका वगळून अन्य महापालिकांसाठी आरक्षण निश्चितीबाबतचे आदेश काढले आहेत.
त्यामुळे या महानगरपालिकांच्या आरक्षण सोडती निघाल्यानंतरच आता मुंबई महापालिकेसाठी आरक्षण काढले जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाकडेच आता पालिका प्रशासनाचे आणि उमेदवारांचेही लक्ष लागून राहिले आहे.
राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लवकरच अपेक्षित असून मुंबई महापालिकेने आगामी निवडणूकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा अंतिम आराखडा जाहीर झाल्यानंतर आता सगळ्यांचे लक्ष आरक्षणाकडे लागले आहे. मात्र गेल्या आठवड्यात दिवाळीमुळे या सगळ्या प्रक्रियेला थोडासा विलंब झाला. दिवाळीनंतर आरक्षण सोडतीबाबतच्या तारखा जाहीर होतील अशी अपेक्षा होती.
मात्र निवडणूक आयोगाने २४ ऑक्टोबरला मुंबई महापालिका वगळून अन्य २९ महापालिकांसाठी आरक्षण निश्चितीबाबतचे आदेश काढले आहेत. या महापालिकांबाबतच्या आरक्षण कार्यक्रमानंतर मुंबई महापालिकेच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्षात नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबई महापालिका निवडणूकीसाठी आरक्षणाच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता पालिकेतील सूत्रांनी व्यक्त केली आहे.
लॉटरीच्या तयारीसाठी तीन आठवडे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महानगरपालिकेसाठी आरक्षण लॉटरीचे आदेश काढले तरच नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापर्यंत आरक्षण सोडत निघू शकते, असेही पालिकेतील सूत्रांनी सांगितले.
लोकसंख्येप्रमाणे प्रत्येक प्रभागाची सांख्यिकी, माहिती पाठवावी लागते, ती मंजूर करवून घ्यावी लागते. त्यानंतरच प्रत्यक्षात लॉटरी निघणार आहे. त्यामुळे २२७ प्रभागांच्या लोकसंख्येची माहिती आणि त्यातील अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग लोकांची संख्या याची माहिती पाठवून ती मंजूर केल्यानंतरच आरक्षण निघू शकणार आहे.
६ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी …
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने सध्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार ६ नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणूकीच्या मतदार यादीवरून तयार केलेली मतदार यादी प्रसिद्ध करून त्यावर सूचना व हरकती मागवल्या जाणार आहेत. १४ नोव्हेंबरपर्यंत सूचना व हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर ४ डिसेंबर रोजी मतदान केंद्राच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
तर १० डिसेंबर रोजी मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदार यादीचाच कार्यक्रम डिसेंबर पर्यंत चालणार आहे. सध्या विधानसभा निवडणूकीच्या मतदार याद्या प्रभाग निहाय फोडण्याचे काम सुरू असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
