मुंबई : गणेशोत्सव संपला असला तरी उत्सवाच्या खाणाखुणा अद्याप शहरात जागोजागी दिसत आहेत. विशेषतः मंडळांच्या बाहेरच्या रस्त्यावर राजकीय व्यावसायिक जाहिरात फलक यांची गर्दी झाली आहे. हे फलक हटवण्याचे आता मुंबई महापालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.
गणेशोत्सव काळात धार्मिक, राजकीय आणि व्यावसायिक जाहिरात फलकांचे अक्षरशः पेव फुटलेले असते. गणेशोत्सव मंडळांना जाहिरात देणाऱ्या राजकीय पक्षांच्या, लोकप्रतिनिधींच्या किंवा विविध व्यावसायिक संस्थांच्या जाहिराती मंडळाच्या परिसरात लावलेल्या असतात. मुंबईत प्रत्येक गल्लीत सार्वजनिक गणेश मंडळ असल्यामुळे या जाहिरातींनी गणेशोत्सव काळात सगळे रस्ते व्यापलेले दिसतात. त्यामुळे शहर विद्रुप दिसते. गणेशोत्सव पार पडला की हे जाहिरात फलक काढून टाकण्याचे काम मंडळे करीत नाहीत. त्यामुळे पालिकेच्या परवाना विभागाने यंदा आधीच जाहिरात फलक काढण्याची मोहीम हाती घेतली आहे.
गणेशोत्सवात हार, फुले, मिठाई यांची जशी रेलचेल असते तशीच गल्लोगल्ली, रस्तोरस्ती जाहिरात फलकांचीही संख्या वाढलेली असते. त्यात यंदा अधिकच भर पडली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकत असल्यामुळे यावेळी राजकीय जाहिरात फलकांची संख्या अधिकच वाढलेली दिसत होती. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मंडळांना आपलेसे करण्यासाठी आर्थिक मदत केल्यामुळे त्यांचे फलक मंडपांच्या बाहेरच्या रस्त्यावर झळकत होते. याच जाहिरातींमध्ये विविध व्यावसायिक स्वरुपाच्या जाहिरातीही होत्या.
मंडपांच्या बाहेरच्या या जाहिरातींबरोबरच नाक्यानाक्यावर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांचे जाहिरात फलकही लागले आहेत. कुठेही पदपथावर, सिग्नल झाकला जाईल अशा वाट्टेल त्या पद्धतीने हे फलक लावण्यात आले आहेत. हे सगळे फलक हटवण्याचे काम आता पालिकेच्या अनुज्ञापन विभागाने सुरू केले आहे.
मुंबई विद्रुप होऊ नये म्हणून जाहिरात फलकांबाबत उच्च न्यायालयाने कितीही फटकारले असले तरी त्याला न जुमानता जाहिरात फलक उत्सव काळात जागोजागी लागले आहेत. विसर्जनानंतर अनुज्ञापन विभागाने परवाना संपलेले आणि अनधिकृतरित्या लावलेले जाहिरात फलक हटवण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. गणेशोत्सवामध्ये प्रदर्शित करण्यासाठी परवानगी दिलेले साहित्य परवानगीची मुदत संपल्यामुळे हटवण्यात येणार आहे. तसचे अनधिकृतरित्या लावलेले बॅनर, फलक, तात्पुरते प्रवेशद्वार, भित्ती पत्रके अशा सर्वच बाबींचा या कार्यवाहीत समावेश असेल अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यानी दिली.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या उपायुक्त चंदा जाधव यांनी सांगितले की, रविवारपासूनच मुंबई विविध ठिकाणचे जाहिरात फलक हटवण्यास सुरूवात करण्यात आली असून आतापर्यंत साडे सात हजार जाहिरात फलक हटवण्यात आले आहेत. त्यापैकी ६५९१ फलक हे गणेशोत्सवाशी संबंधित आहेत. फलक हटवण्याची कारवाई पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
७ व ८ सप्टेंबर रोजी हटवलेले फलक
- एकूण हटवलेले फलक – ७४५४
- गणेशोत्सवाचे जाहिरात फलक – ६५९१
- झेंडे – ७२५
- व्यावसायिक जाहिरातींचे फलक – १३८