मुंबई : संपूर्ण शहरात एकूण २,१२१ किमी लांबीचे रस्ते असून त्यापैकी ७७१ किमी लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. पावसाळ्यामुळे थांबविण्यात आलेल्या रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. या सर्व कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी महापालिकेने ‘सिमेंट काँक्रिटायझेशन रोड्स इन मुंबई’ हा नवीन डॅशबोर्ड विकसित केला आहे. यातून रस्त्यांची यादी, मॅपिंग, पूर्ण झालेल्या कामांची छायाचित्रे, कंत्राटदार व अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक, तसेच पुढील कामांचे नियोजन नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. हा डॅशबोर्ड ४ सप्टेंबरपासून कार्यान्वित करण्यात आला आहे.

मुंबई खड्डेमुक्त करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनाने रस्ते काँक्रीटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. मुंबईत एकूण २,१२१ किमी लांबीचे रस्ते असून त्यापैकी ७७१ किमी लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच, ५७४ किमी लांबीच्या रस्त्यांची कामे अंशतः पूर्ण झाली आहेत. सुमारे ७७६ किमी लांबीच्या रस्त्यांची कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. रस्ते काँक्रीटीकरणाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील ७९८ किमीपैकी ३४२ किमीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.

दरम्यान, रस्त्यांच्या अपुऱ्या कामांमुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांना त्रास होऊ लागला आहे. या समस्येवर ठोस उपाययोजना करण्यासाठी मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार व महापालिका अधिकाऱ्यांमध्ये नुकतीच बैठक पार पडली.

त्यावेळी ‘सिमेंट काँक्रिटायझेशन रोड्स इन मुंबई’ या डॅशबोर्डविषयी माहिती देण्यात आली. रस्ते काँक्रीटीकरणात पारदर्शकता आणण्यासाठी हे डॅशबोर्ड तयार करण्यात आले आहे. ४ सप्टेंबरपासून कार्यान्वित करण्यात आलेल्या या डॅशबोर्डच्या माध्यमातून नागरिकांना रस्त्यांची यादी, मॅपिंग, पूर्ण झालेल्या कामांची छायाचित्रे, कंत्राटदार व अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध होतील. रस्ते कामाबाबतच्या तक्रारी करण्याची सुविधाही डॅशबोर्डवर उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना आशिष शेलार यांनी केली. बैठकीला महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या डॅशबोर्डवर रस्त्याच्या कामादरम्यान फुटलेल्या जलवाहिन्या, तुटलेल्या विजेच्या तारा आदींची माहिती द्यावी आणि त्या नुकसानास जबाबदार असलेल्या कंत्राटदारांना दंड करावा, असे आदेश शेलार यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले.