मुंबई : शहर तसेच उपनगरातील पदपथ आणि अन्य सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने कंबर कसली असून लवकरच फेरीवालामुक्त परिसर मोहिमेची अंमलबजावणी अधिक तीव्र करण्यात येणार आहे. महानगरपालिकेने उच्च न्यायालयात फेरीवाल्यांच्या गर्दीने व्यापलेल्या २० ठिकाणांची यादी सादर केली होती. त्यानुसार आता संबंधित ठिकाणे फेरीवालामुक्त करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. सीएसएमटी, कुलाबा कॉजवे, वांद्रयातील लिंकिंग रोड, हिल रॉड, दादर अंधेरी, मालाड, घाटकोपर रेल्वे स्थानकांसह अन्य ठिकाणांचा समावेश आहे.

रस्ते आणि पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांची समस्या दिवसेंदिवस उग्र होत आहे. मुंबईकरांना पदपथ आणि रस्त्यांवरून ये – जा करताना अडथळा ठरणाऱ्या, तसेच उघड्यावर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महानगरपालिका सातत्याने कारवाई करत असते. मात्र, तरीही फेरीवाल्यांची समस्या मार्गी लावण्यात पालिकेला यश आलेले नाही. पदपथांवर पथाऱ्या पसरून फेरीवाले कारवाईची चिंता न करता राजरोसपणे व्यवसाय करत आहेत. फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडीचीही समस्या जटील होत असून अनेक वेळा प्रवासी व फेरीवाल्यांमध्ये शाब्दिक वाद होतात. तसेच, अनेकदा वाद, मारामारी झाल्याचेही यापूर्वी समोर आले आहे.

दरम्यान, हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले असता न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिका हद्दीतील वर्दळीची २० ठिकाणे फेरीवालामुक्त करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी महानगरपालिका प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयात मुंबईतील २० ठिकाणांची यादी सादर केली होती. त्यानंतर आता महापालिकेने ही मोहीम राबवण्याचे नियोजन केले आहे. यासाठी पालिकेच्या विभाग स्तरावर कार्यवाही हाती घेण्यात येणार आहे. संबंधित ठिकाणावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचे कुठे स्थलांतर करायचे, याबाबत अभ्यास केला जाईल. तसेच, फेरीवाल्यांची बाजू ऐकून, त्यांना विश्वासात घेऊन ही योजना राबवली जाणार आहे.

संबंधित प्रक्रिया वेळखाऊ असल्याने परिसर फेरीवालामुक्त होण्यास काहीसा वेळ लागेल. मात्र, ही कार्यवाही तातडीने हाती घेण्यात येईल. निश्चित करण्यात आलेल्या २० ठिकाणांसह अन्य ठिकाणीही शक्य तिथे ही कारवाई राबविण्याचा पालिकेचा मानस आहे, असे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिकेने न्यायालयात सादर केलेल्या यादीत २० ठिकाणे आहेत. सीएसएमटी, उच्च न्यायालयाजवळील भाग, कुलाबा कॉजवे, दादरमधील पूर्व आणि पश्चिमेकडील रेल्वे परिसर, दादर टीटी, करी रोड, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, मथुरादास रोड, मालाडमधील पश्चिमेकडील रेल्वे परिसर, बोरिवली पश्चिम, भरूच रोड, कुर्ला पश्चिम, वांद्रे येथील लिंकिंग रोड व हिल रोड, घाटकोपर पूर्व आणि पश्चिमेकडील रेल्वे परिसर, लोकमान्य टिळक मार्ग, मोहम्मद अली रोड, एलबीएस रोड आदी ठिकाणांचा त्या यादीत समावेश आहे. ही मोहीम महानगरपालिका प्रशासन आणि मुंबई पोलीस संयुक्तपणे कार्यवाही करणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संबंधित ठिकाणांवर वर्षानुवर्षे अनधिकृत फेरीवाले पथाऱ्या पसरून व्यवसाय करत आहेत. दुकानातील सामानापेक्षा फेरीवाल्यांकडे तुलनेने कमी किंमतीत वस्तू उपलब्ध होत असल्याने नागरिकांचीही खरेदीसाठी कायम गर्दी असते. मात्र, पादचाऱ्यांची गैरसोय होते. चालण्यासाठी पदपथांवर जागा राहात नाही. रस्त्यावरील वाहतूकीतून चालण्याची कसरत पादचाऱ्यांना करावी लागते. महानगरपालिकेचे अतिक्रमण निर्मूलनाचे पथक कारवाईसाठी दाखल होताच सर्व फेरीवाले पळून जातात. त्यामुळे काही वेळासाठी पदपथ, रस्ते मोकळे होतात. मात्र, पालिकेचे पथक निघून गेल्यानंतर काही वेळात पुन्हा फेरीवाले रस्त्यावर पथाऱ्या पसरतात. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.