मुंबई : गेल्यावर्षीपर्यंत घरगुती गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करायचे की नाही हा प्रश्न ऐच्छिक होता. यंदा मात्र सहा फुटांखालील गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करावे लागणार आहे. त्यामुळे जवळपास सर्वच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन यंदा कृत्रिम तलावातच होणार आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात विसर्जनाचा भार कृत्रिम तलावांवर येणार आहे. परिणामी, कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी लागणार आहे. त्याचे नियोजन करताना मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांचेही काम वाढणार आहे.
यंदा २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. पीओपीच्या मूर्तीवरील बंदी न्यायालयाने उठवल्यामुळे मूर्तिकारांना दिलासा मिळाला असला तरी अन्य काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यातच न्यायालयाने सहा फुटांवरील गणेशमूर्तींनाच नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनाला परवानगी दिली आहे. त्यामुळे सहा फुटांच्या आतील सर्वच घरगुती गणेशमूर्तींचे यंदा कृत्रिम तलावात विसर्जन करावे लागणार आहे. मुंबई महापालिकेने घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामुळे विभाग कार्यालयांचेही काम वाढणार आहे.
मूर्तिकारांसाठी सूचना
प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती तयार करणारे व विक्रेते यांनी मूर्तीच्या मागील बाजूस स्पष्ट दिसेल असे लाल रंगाचे गोल आकाराचे चिन्ह करणे बंधनकारक आहे. तसेच मूर्ती तयार करणारे व विक्रेते यांनी मूर्तीची विक्री करताना सदर बाबतची नोंदवही ठेवणे बंधनकारक आहे. सर्व विभागीय सहाय्यक आयुक्तांनी मूर्तीकार, तसेच विक्रेत्यांमार्फत याची अंमलबजावणी होत असल्याची खातरजमा करावी. नागरिकांना विसर्जनाविषयी मार्गदर्शन मिळण्यासाठी सर्व विभागीय सहाय्यक आयुक्तानी गणेश मूर्ती विक्रेत्यांकडे विसर्जनासंदर्भातील माहिती पत्रके वितरित करावीत, असे या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.
अशी आहेत मार्गदर्शक तत्त्वे
- आतापर्यंत सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या बहुसंख्य घरगुती गणपतींचे नैसर्गिक स्थळी विसर्जन करण्यात येत होते. आता त्या सगळ्या मूर्तीचा भार आता कृत्रिम तलावांवर येणार आहे हे गृहित धरून नियोजन करणे आवश्यक आहे.
- सर्व विभागीय सहायक आयुक्तांनी मागील वर्षी आपल्या कार्यक्षेत्रातील, तसेच जवळील नैसर्गिक विसर्जन स्थळी विसर्जित करण्यात आलेल्या ६ फुटापर्यंतच्या पीओपी मूर्तीचा आढावा घ्यावा. त्याआधारे यावर्षी कृत्रिम तलावांची संख्या, क्षमतेचे नियोजन व उभारणी करावी.
- कृत्रिम तलावाकडे जाणाऱ्या मार्गावर आवश्यक तेथे दिशादर्शक फलक लावावेत. तसेच विसर्जनापूर्वी निर्माल्य संकलन करण्याची व्यवस्था कृत्रिम तलावानजीक करावी.
- नवीन ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करताना मूर्तीचे विसर्जन, तसेच व्यवस्थापन सुलभपणे करता येईल याची दक्षता घ्यावी, यासाठी ट्रक व इतर वाहनांची वाहतूक सुरळीत होईल अशी स्थळे निवडावीत.
- गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव सलग उपलब्ध व्हावे यासाठी विसर्जित मूर्तीच्या संकलनाची वारंवारिता वाढवण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून विसर्जित मूर्तीमुळे तलाव पूर्णपणे भरणार नाही
सुमारे दोन लाख घरगुती गणेशमूर्ती
मुंबईत दरवर्षी गणेशोत्सवात दीड दिवसाचे, पाच दिवसाचे, सात दिवसाचे आणि अकरा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. संपूर्ण अकरा दिवसांच्या उत्सवात दोन लाख घरगुती गणेशमूर्ती आणि सुमारे ११ हजार सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन होते. चौपाटी, तलावांसह ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. मुंबई महापालिकेतर्फे तयार केल्या जाणाऱ्या कृत्रिम तलावांची संख्या दरवर्षी वाढवली जाते. गेल्यावर्षी २०४ तलाव तयार करण्यात आले होते. एकूण घरगुती गणेशमूर्तींपैकी केवळ ४० टक्के म्हणजेच सुमारे ६० हजार मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात येते. यंदा दोन लाख मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे लागणार आहे. परिणामी, ताण कृत्रिम तलावांवर येणार आहे.
कृत्रिम तलावातील मूर्तींचे काय होणार
कृत्रिम तलावामध्ये विसर्जन पश्चात जमा झालेल्या गाळाची साठवण पर्यावरणपूरक पद्धतीने केली जाणार आहे. त्याचा उपयोग पुनर्वापर व पुनर्निमितीसाठी करण्यात येणार आहे. याबाबत आवश्यक देखरेख व संनियंत्रण महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.