मुंबई : निरुपयोगी मोबाईल, चार्जर, बॅटरी, संगणक, दूरचित्रवाणी संच आणि लहान उपकरणांसारख्या तत्सम सर्व ई-कचऱ्याचे संकलन महापालिकेने सुरू केले आहे. मात्र गेल्या पाच महिन्यांमध्ये २१.५७० हजार किलो ई कचऱ्याचे संकलन करण्यात आले आहे. मुंबईकरांकडून पाच हजार किलो, विविध ठिकाणच्या गोदामांमधून १० हजार किलो, तर उद्योग क्षेत्रातून सहा हजार किलो कचऱ्याचे संकलन करण्यात आले आहे. नागरिकांकडे ई कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध असल्याने पालिकेच्या या उपक्रमाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईत सध्या दररोज सुमारे ७ ते ८ दशलक्ष टन घनकचरा निर्माण होतो. या कचऱ्याच्या योग्य व्यवस्थापनाची गरज ओळखून महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत २२ एप्रिल २०२५ पासून ‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ (डोमेस्टीक सॅनिटरी अँड स्पेशल केअर वेस्ट कलेक्शन) सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यांनतर, ५ मे २०२५ पासून स्वतंत्र ई-कचरा संकलन सेवा सुरू करण्यात आली. या अंतर्गत निरुपयोगी मोबाइल, चार्जर, बॅटरी, संगणक, दूरचित्रवाणी संच आणि लहान उपकरणांसारख्या तत्सम सर्व ई-कचऱ्याचे संकलन केले जाते.
मुंबईत वीजकीय (इलेक्ट्रॉनिक) उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात ई-कचरा तयार होतो. या धोकादायक स्वरूपाच्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे व पुनर्प्रक्रिया तसेच पुनर्वापर करण्याची गरज ओळखून पालिकेने ही सेवा सुरू केली. या कचऱ्याचे संकलन, विल्हेवाट व पुनर्प्रक्रियेसाठी पालिकेने एका संस्थेची नियुक्ती केली आहे. ही सेवा सुरू केल्यानंतर मे महिन्यात सुमारे ५ हजार कचऱ्याचे संकलन करण्यात आले होते, तर ऑगस्टमध्ये सुमारे ७ हजार कचऱ्याचे संकलन करण्यात आले.
या सुविधेबाबत नागरिकांना अद्याप पुरेशी माहिती नसल्याने पालिकेतर्फे जनजागृती केली जात आहे. जेणेकरून नागरिकांना याबाबत पूर्ण माहिती मिळेल आणि कचरा संकलन उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळेल. तसेच, जुना मोबाईल , टिव्ही, फ्रीज किंवा संगणक यांची विविध संकेतस्थळावर विक्री करून त्याबदल्यात नवीन वस्तू खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे या वस्तू पालिकेला देणे अनेकजण टाळत असल्याचे समजते.
ई कचरा संकलनासाठी पालिकेतर्फे क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यावरून नागरिकांना ई कचऱ्याबाबत माहिती देता येते. त्यांनतर कचरा संकलनासाठी येणारे कामगार नागरिकांना त्याबदल्यात पैसे देऊन कचऱ्याचे संकलन करतात.
ई कचऱ्यात शिसे, पारा, कॅडमियमसारखे विषारी घटक
ई-कचरा सर्वसाधारण कचऱ्यात मिसळल्यामुळे त्यातील शिसे (लीड), पारा (मर्क्युरी), कॅडमियम यांसारख्या विषारी घटकांमुळे पर्यावरण आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ई-कचरा संकलन सेवा सुरू करण्यात आली आहे.
कुठून किती कचरा जमा झाला?
सामान्य नागरिक – ५३५३.७ किलो
उद्योग क्षेत्र – ६१८२.२४ किलो
गोदाम, वेअरहाऊस – १००४० किलो