मुंबई : कबुतरखाने बंद करण्याबाबतचा वाद न्यायालयात पोहोचला असून त्याला राजकीय वळणही आले आहे. त्यामुळे कबुतरखाने सुरू करायचे झाल्यास ते लोकवस्तीपासून पाचशे मीटर अंतरावर तयार करता येतील का याची चाचपणी मुंबई महापालिका करीत आहे. अशा जागा विभाग स्तरावर शोधल्या जात आहेत. मात्र दाटीवाटीने वस्ती असल्यामुळे शहर भागात हा निकष लावता येणार नाही असे आढळून आले आहे.
मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने तत्काळ मोहीम राबवावी असे निर्देश राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने दुसऱ्याच दिवशी दादरच्या सुप्रसिद्ध कबुतरखान्यावर कारवाई केली होती. कबुतरखान्याच्या वरील अनधिकृत बांधकाम हटवले, तसेच कबुतरांसाठी जमा केलेले खाद्यही हटवले.
पालिकेच्या या कारवाईच्या विरोधात काही पक्षीप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने कबुतरखाना बंद करण्यासंबंधी आदेश दिले होते. या प्रकरणाचा वाद अद्याप संपलेला नसून पुन्हापुन्हा हा विषय डोके वर काढत आहे.
त्यातच काही दिवसांपूर्वी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात एका जैन मंदिरालगत नवीन कबुतरखाना सुरू करण्यात आला आहे. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या कबुतरखान्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी लोढा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्येक विभागात असे कबुतरखाने सुरू करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
कबुतरखान्याचा वाद न्यायालयात पोहोचला असून भविष्यात कबुतरखाने प्रत्येक विभागात सुरू करण्याची वेळ आली तर अशा जागा शोधण्याची तयारी मुंबई महापालिका प्रशासनाने केली आहे. सर्व विभाग अधिकाऱ्यांना अशा जागा शोधण्याचे तोंडी आदेश देण्यात आले आहेत. संजय गांधी उद्यानातील कबुतरखान्याला देखील पाचशे मीटर अंतराचा निकष लावूनच परवानगी दिल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
शहर भागात अशा जागा अशक्य ?
लोकवस्तीपासून पाचशे मीटर दूर अशा जागा मुंबईत मिळणे अवघड आहे. त्यातही शहर भागात अनेक विभाग हे अतिशय लहान असून दाटीवाटीने वसाहती आहे. त्यामुळे प्रत्येक विभागात अशी जागा मिळणे मुश्कील असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
रेसकोर्स, आरे कॉलनीवर कबुतरखाने ?
कबुतरांच्या विषयावर न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवत सुवर्णमध्य काढण्याचे आवाहन लोढा यांनी यापूर्वी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्राद्वारे केले होते. बीकेसी, रेसकोर्स, आरे कॉलनी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांसारख्या मोकळ्या जागांवर कबुतरांना खाद्य घालण्यासाठी सुरक्षित व नियंत्रित आहार क्षेत्र म्हणून निश्चित करावे अशीही मागणी त्यांनी केली होती.