scorecardresearch

अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचा राणेंचा अर्ज फेटाळला

पालिकेने ७ एप्रिल रोजी राणे यांना पत्र पाठवून अनधिकृत बांधकाम नियमित करण्यास नकार दिला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : सांताक्रूझ येथील जुहू तारा रोडवरील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आठ मजली ‘अधिश’ बंगल्यामधील अनधिकृत बांधकाम नियमित करण्यास मुंबई महापालिकेने नकार दिला आहे. या संदर्भात सादर केलेल्या अर्जामध्ये आवश्यक ती कागदपत्रे न जोडल्यामुळे पालिकेने अनधिकृत बांधकाम नियमित करण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर पालिकेने राणे यांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदतही दिली आहे.

नारायण राणे यांच्या आठ मजली ‘अधिश’ बंगल्यामध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी पालिकेकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन पालिकेच्या के-पश्चिम विभाग कार्यालय आणि इमारत प्रस्ताव खात्यातील कर्मचाऱ्यांचा  पथकाने ‘अधिश’ची पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान बंगल्यात अंतर्गत बदल, अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचे पथकाच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर पालिकेने अनधिकृत बांधकाम प्रकरणी राणे यांना नोटीस बजावली होती. या नोटीसला राणे यांनी उत्तर सादर केले होते. तसेच बंगल्यातील अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी राणे यांनी पालिकेला अर्ज केला होता. मात्र पालिकेने ७ एप्रिल रोजी राणे यांना पत्र पाठवून अनधिकृत बांधकाम नियमित करण्यास नकार दिला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bmc rejects narayan rane s plea seeking regularization of unauthorized construction in juhu zws

ताज्या बातम्या