मुंबई : दादरच्या कबुतरखान्यावर मुंबई महापालिकेने रविवारी रात्री पुन्हा एकदा आच्छादन घातले आहे. गेल्या आठवड्यात जैन धर्मीयांनी आणि पक्षीप्रेमींनी आच्छादन फडून टाकले होते. कबुतरखाने बंद करण्याचे आदेश कायम ठेवल्याचे ८ ऑगस्टच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. पुढील सुनावणी १३ ऑगस्टला होणार असून या सुनावणीकडे महापालिका प्रशासनासह जैन धर्मियांचेही लक्ष लागले आहे. या सुनावणीआधीच सावधगिरी बाळगत मुंबई महापालिकेने आच्छादन घातले आहे.
दादरमधील कबुतरखाना बंद करण्यावरून सध्या मोठा वाद सुरू असून हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. या विषयावरून वातावरणही चांगलेच तापले आहे. कबुतरखाना बंद करण्यास जैन समुदायाने आणि पक्षीप्रेमींनी कडवा विरोध केला आहे. मुंबई महापालिकेने कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई केल्यानंतर काही पक्षीप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवरील सुनावणीच्यावेळी ३ ऑगस्टला उच्च न्यायालयाने कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई केली होती. तसेच खाद्य देणाऱ्यांविरोधात कारवाई करताना पालिकेच्या पथकाच्या कामात अडथळा आणणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. त्यामुळे जैन समाजात प्रचंड नाराजी निर्माण झाली होती.
अखेर पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत नियंत्रित पद्धतीने खाद्य देण्यात यावे व कबुतरखाना बंद करू नये असे आदेश राज्य सरकारने ७ ऑगस्टला दिले होते. त्यामुळे जैन समुदायाने आक्रमक होत दादरच्या कबुतरखान्यावरील ताडपत्री फाडून टाकली. अनेक ठिकाणी जैन समुदायातील नागरिकांनी अनधिकृतपणे नियम मोडून कबुतरांना खाद्य घालण्यास सुरूवात केली आहे. त्यात गिरगाव चौपाटीवर एका व्यक्तीने दहा गोण्या खाद्य टाकल्याची घटना उघडकीस आली होती. तर रविवारी एका व्यक्तीने चार चाकी गाडी उभी करून त्यावर कबुतरांना धान्य घातले.
दरम्यान, गेल्या आठवड्यात मात्र ८ ऑगस्टला झालेल्या सुनावणीच्यावेळी उच्च न्यायालयाने कबुतरखाने बंद करण्याचे आदेश कायम ठेवले आहेत. कबुतरखाना बंद करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिलेला नसला तरी मानवी आरोग्यपेक्षा महत्त्वाचे काही नाही आणि ते धोक्यात येऊ नये यासाठी महापालिकेने दिलेले कबुतरखाना बंदीचे आदेश कायम ठेवले असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणी पुढील सुनावणी १३ ऑगस्ट रोजी होणार आहे.
खाद्य घालणाऱ्यांविरोधात कारवाई…
मात्र ८ ऑगस्टच्या सुनावणीच्या आदल्या दिवशीच जैन धर्मियांनी कबुतरखान्यावरील आच्छादन फाडून टाकले व कबुतरांना धान्य घातले होते. आता पुढील सुनावणीपूर्वीच मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा आच्छादन घातले आहे. तसेच तेथे पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. या ठिकाणी कबुतरांना खाद्य घालणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आधीच उच्च न्यायालयाने दिले आहेत.
दोन्ही बाजूंनी एकत्र येण्याचे आवाहन
दरम्यान, कबुतरखाना बंदीला जैन समुदायाचा कडवट विरोध असून प्रसंगी शस्त्र उचलण्याचा इशाराही जैन मुनींनी प्रसारमाध्यमांवर दिला आहे. तसेच दादरमध्ये मोठ्या संख्येने जमून उपोषणाला बसण्याचाही इशाराही दिला होता. तर दुसरीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीनेही जैनांच्या या दबावतंत्राला उत्तर देण्यासाठी मराठी भाषा प्रेमींनी व स्थानिक महाराष्ट्र निष्ठावंतांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.