मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील मोटर लोडर कामगारांचा संप रद्द झाला असला तरी कामगारांच्या मनात कामगार संघटनांविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. कामगार संघटनांनी प्रशासनाबरोबर करार करून कचरा संकलनाच्या निविदेचा मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे सफाई खात्यातील कामगार आता कामगार संघटनांच्या विरोधात गेले आहेत.

अनेक ठिकाणी कामगारांनी एकत्र येऊन संघटनांचे झेंडे फाडून फेकून दिले असून कामगार संघटनांनी फसवल्याची भावना कामगारांमध्ये निर्माण झाली आहे. कामगारांनी आता कामगार संघटनांवरच आरोप करायला सुरूवात केली असून ‘पन्नास खोके एकदम ओके’ अशा घोषणा कामगारांनी दिल्या. या सगळ्याचा सर्वाधिक फटका महापालिकेतील सर्वात मोठी संघटना असलेल्या म्युनिसिपल मजदूर युनियनला बसला आहे.

संपूर्ण मुंबईतील कचरा संकलन करून वाहून नेण्यासाठी कंत्राटदारांकडून वाहने आणि सेवा घेण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने घेतला असून त्याला सफाई कामगारांच्या संघटनानी विरोध केला होता. गेला महिनाभर यामुळे पालिका वर्तुळातील वातावरण तापले होते. या विषयावरून पालिका प्रशासन विरुद्ध कामगार संघटना असा संघर्ष पेटला होता. मुंबई महापालिकेतील सर्व कामगार संघटना एकत्र येऊन त्यांनी संघर्ष समिती स्थापन केली होती. या निविदेच्या विरोधात संप करावा की करू नये यावर निर्णय घेण्यासाठी संघर्ष समितीने कामगारांचे मतदानही घेतले होते. त्यात ९७ टक्के कामगारांनी संप करण्याच्या बाजून कौल दिला होता. त्यामुळे कुठल्याही क्षणी संप होईल अशी स्थिती निर्माण झाली होती.

सर्व मागण्या मान्य, पण…

अधिवेशन काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. त्यामुळे कामगार संघटनांनी संप स्थगित केला आहे. दरम्यानच्या काळात प्रशासनाबरोबर लेखी करार करावा अशीही कामगार संघटनांनी मागणी केली होती. २८ जुलै रोजी पालिका प्रशासनाने कामगार संघटनांबरोबर करार केला. या करारात कामगारांच्या हिताच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या. मात्र कामगारांचा विरोध असलेल्या निविदेचा मार्ग मोकळा झाल्यामुळे कामगार संघटनांनी आपल्याला फसवल्याची भावना कामगारांमध्ये निर्माण झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंदोलन कामगार संघटनांवरच उलटले

या निविदेच्या विरोधात कामगार संघटनांनी इतके वातावरण तापवले होते की आता कामगारांना शांत करणे संघटनेच्या हाताबाहेर गेले आहे. कामगार संघटना विजयी मेळावा घेणार होत्या. पण कामगारांच्या बैठकीत संघटनांच्या नेत्यांना अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहण्यात आली. तुम्ही निविदेची होळी करणार होतात आमच्या आयुष्याची होळी केली, कामगार संघटना हायहाय म्हणत कामगारच आता संघटनांच्या विरोधात वातावरण तापवू लागले आहेत.

सर्वाधिक फटका म्युनिसिपल मजदूर युनियनला

मुंबई महापालिकेत सर्वाधिक सदस्य शरद राव यांच्या म्युनिसिपल मजदूर युनियनचे आहेत. या संघटनेच्या कामगारांचा रोष मोठा आहे आणि तो संघटनेसाठी त्रासदायक ठरणार आहे. कामगारांनी झेंडे फाडून फेकल्यामुळे येत्या काळात संघटनेचे सभासद कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.