मुंबई : उपक्रमशील शिक्षकांमुळे मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील इयत्ता दहावीचा निकाल ९३ टक्के इतका लागला. यापुढे १०० टक्के निकाल कसा लागेल लागण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत. शिक्षक आपल्या शाळेत राबवित असलेले उपक्रम वाखाणण्याजोगे आहेत. हे उपक्रम महानगरपालिकेच्या इतर शाळेत राबविण्यात यावेत, काही निवडक आणि चांगल्या उपक्रमांची निवड करून त्यावर आधारित एक उत्तम शैक्षणिक विशेषांक तयार करण्यात येईल, असे मत महापालिका अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी व्यक्त केले.

महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी आणि अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली निर्धारित निकषांनुसार महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) समितीतर्फे आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली होती.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील (राणीची बाग) पेंग्विन सभागृहात बुधवारी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी डॉ. सैनी बोलत होते. शैक्षणिक क्षेत्रात क्रियाशील असलेल्या शिक्षकांमुळे विद्यार्थी गुणवंत होतात, त्यांचा शैक्षणिक आलेख उंचावतो. हे कौतुकास्पद आहेच, मात्र यासोबतच आपल्या वर्गातील शैक्षणिक दृष्टीने मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना शोधावे आणि त्यांना अभ्यासात पुढे आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन सैनी यांनी शिक्षकांना केले.

महानगरपालिकेने शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांची ५ सप्टेंबर रोजी ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारा’साठी निवड केली होती. या पुरस्कारप्राप्त शिक्षकांना बुधवारी प्रत्येकी ११ हजार रुपये, महानगरपालिका मानचिन्हाचे पदक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व फेटा प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यावेळी उप आयुक्त प्राची जांभेकर, संचालक डॉ. संजय त्रिपाठी, शिक्षणाधिकारी सुजाता खरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबई महानगरपालिकेच्या ५० उपक्रमशील शिक्षकांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.

उपक्रमशील शिक्षकांचा गौरव

सन २०२४-२५ च्या पुरस्कारासाठी आदर्श शिक्षकांची निवड करण्यासाठी महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व विनाअनुदानित शाळांतील एकूण १४२ शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून ५० आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली.

पुरस्कारार्थींमध्ये २७ महिला शिक्षकांसह २३ पुरुष शिक्षकांचा समावेश आहे. तसेच पुरस्कारार्थींमध्ये मराठी माध्यमाचे १०, इंग्रजी माध्यमाचे ५, हिंदी माध्यमाचे ६, उर्दूचे ६, गुजराथी भाषा एक, विशेष मुलांची शाळेतील एक शिक्षक, मान्यताप्राप्त खासगी अनुदानित व विनाअनुदानित १२ यासह तमीळ, तेलगू आणि कन्नड माध्यमाच्या शाळा मिळून एक, शारीरिक शिक्षण, चित्रकला, हस्तकला/कार्यानुभव आणि संगीत या माध्यमाच्या शाळांमधून प्रत्येकी एक आणि माध्यमिक शाळांमधून ४ अशा एकूण ५० शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.