मुंबई : महाराष्ट्रातील १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्यानंतर या किल्ल्यांची महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती मिळावी, यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार महानगरपालिकेच्या २३ शाळांमध्ये १२ किल्ल्यांवर आधारित चित्रकला स्पर्धा नुकतीच पार पडली. विद्यार्थ्यांनी रेखाटलेली मनमोहक चित्रे पाहून युनेस्कोचे भारतातील राजदूत विशाल शर्मा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
महाराष्ट्रातील ११ किल्ले आणि तामिळनाडू येथील जिंजी अशा १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला आहे. त्या अनुषंगाने युनेस्कोचे भारतातील राजदूत विशाल शर्मा २७ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत मुंबई येथे शासकीय दौऱ्यावर आले आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये ३० जुलै रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यापैकी वरळीतील सी फेस शाळेतील स्पर्धेत विशाल शर्मा उपस्थित होते. प्रत्येक शाळेतील २०० असे मिळून एकूण ५ हजार विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेले स्वराज्य संपूर्ण जगासाठी आदर्श आहे. स्वराज्य अबाधित रहावे यासाठी महाराजांनी गड-किल्ले उभारले. हे किल्ले शिवरायांच्या शौर्याचे प्रतिक आहेत. भावी पिढीला या गड-किल्ल्यांतून प्रेरणा, आत्मविश्वास आणि लढण्याचे बळ मिळते, असे मत खारगे यांनी व्यक्त केले. भारतातील १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्यामुळे जगभरातील पर्यटक आता शिवरायांचे स्वराज्य अनुभवायला भारतात येतील. किल्ल्यांचे महत्त्व समजून घेतील. या किल्ल्यांचा इतिहास नव्या पिढीला समजायला हवा, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
युनेस्कोचे भारतातील राजदूत विशाल शर्मा यांनी महानगरपालिकेने चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून किल्ल्यांबाबत सुरू केलेल्या जनजागृती मोहिमेचे कौतुक केले. तसेच त्यांनी उपस्थित शिक्षकांकडून किल्ल्यांबाबत माहिती जाणून घेतली. वरळी सी फेस शाळेतील विविध उपक्रम, विविध दालनांना त्यांनी भेट दिली. संगीत विभागाला भेट दिली असता तेथे विकास खारगे यांनी स्वत: बासरीवर ‘सारे जहाँ से अच्छा’ या गिताची धून वाजवून उपस्थिस्तांना अचंबित केले.