मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत मुंबई शहरात गेल्या तीन वर्षांमध्ये (२०२२-२३ ते २०२४-२५) या कालावधीत पुरूष आणि स्त्री नसबंदी मिळून एकूण ३४ हजार ८०५ शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या.
महानगरपालिकेची प्रमुख रुग्णालये,सर्वसाधारण रुग्णालये, प्रसूतीगृहे यांनी कुटुंब कल्याण कार्यक्रमअंतर्गत पुरूष – स्त्री नसबंदी शस्त्रक्रियांमध्ये उत्तम कामगिरी करत नवा आदर्श ठेवला आहे. कुटुंब कल्याण कार्यक्रमअंतर्गत नागरिकांना नि:शुल्क पद्धतीने सेवा पुरविल्या जातात. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अंतर्गत स्त्री नसबंदी आणि पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया, तांबी बसविणे, गर्भनिरोधक गोळी (स्त्रियांच्या वापरासाठी), प्रचलित संतती प्रतिबंधक (निरोध), ‘अंतरा’ इंजेक्टेबल गर्भनिरोधक आदी साधनांचे वाटप करण्यात येते.
मुंबई महानगरपालिकेच्या एफ / दक्षिण कुटुंब कल्याण केंद्र विभागाला पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता मिळालेली आहे. पुरूष नसबंदी व स्त्री शस्त्रक्रियेनंतर, प्रसुतिपश्चात तांबीनंतर शासन नियमानुसार रूग्णाला मोबदला दिला जातो. स्त्री आणि पुरूष नसबंदी शस्त्रक्रियेअंतर्गत अयशस्वी आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी तसेच शस्त्रक्रियेदरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाल्यास मृतांच्या वारसांना शासनाच्या धोरणानुसार नुकसान भरपाई देण्यात येते.
कुटुंब कल्याण नियोजन कार्यक्रमअंतर्गत गत तीन वर्षांमध्ये (२०२२-२३ ते २०२४-२५) मुंबई महानगरात एकूण ३४ हजार ८०५ पुरूष आणि स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामध्ये एकूण १४६७ पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया आणि ३३ हजार ३३८ स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच तीन वर्षांत अंतरा इंजेक्टेबल गर्भनिरोधक इंजेक्शन १० हजार १७५ महिलांना देण्यात आले. तसेच एकूण ६१ हजार ३५३ महिलांना तांबी (कॉपर टी) बसविण्यात आली. प्रचलित संतती प्रतिबंधक (निरोध) एकूण ३२ हजार ७० जणांना देण्यात आले. तर गर्भनिरोधक गोळ्या एकूण ५६ हजार महिलांना देण्यात आल्या.
लोकसंख्या स्थिरता सप्ताह
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जागतिक लोकसंख्या दिनाच्या पार्श्वभूमीवर लोकसंख्या स्थिरता सप्ताहाचे आयोजन दिनांक ११ जुलै ते १८ जुलै २०२५ या कालावधीत करण्यात आले होते. जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने यंदाच्या वर्षाची संकल्पना ही ” आई होण्याची योग्य वेळ तेव्हा तन व मन तयार जेव्हा.” ही आहे. या कालावधीत पुरूष – स्त्री नसबंदी ७८ शस्त्रक्रिया, एकूण तांबी ११६, अंतरा ६७ आणि इतर साधनाचे वाटप विविध केंद्रांमध्ये करण्यात आले.
तसेच कुटुंब कल्याण केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सेवांचा प्रचार महानगरपालिकेच्या विविध प्रशासकीय विभाग (वॉर्ड) अंतर्गत करण्यात आला. कुटुंब नियोजन साधनाचा वेळीच उपयोग करून सुरक्षित मातृत्वाची आणि सुदृढ बाळाची संधी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.