मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता ८ वी) परीक्षेत महानगरपालिकेच्या एकूण ९५३ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ५ वीमधील ५३६ आणि इयत्ता ८ वीमधील ४१७ विद्यार्थ्यांचा समवेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत आलेख उंचावत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (पुणे) दरवर्षी पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. यंदा ९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात आली होती. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत महानगरपालिका शिक्षण विभागातील इयत्ता ५ वीतील ५३६ आणि इयत्ता ८ वीतील ४१७ अशा एकूण ९५३ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत (मेरिट लिस्ट) स्थान मिळविले. जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दरमहा शिष्यवृत्ती मिळणार आहे. या गुणवत्ता यादीत (मेरिट लिस्ट) स्थान मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा भायखळा (पूर्व) येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.
महानगरपालिकेचे हजारो विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेत सहभागी होतात. विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा, तसेच निकालात वाढ व्हावी, यासाठी महानगरपालिकेचा शिक्षण विभाग विविध उपक्रम राबवित आहे. गेल्या तीन वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षेत महानगरपालिका शाळेच्या विद्यार्थ्यांचा यशाचा आलेख उंचावत आहे. गतवर्षी महानगरपालिकेच्या ६०३ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले होते. यंदा तब्बल ९५३ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.
यंदाच्या परीक्षेत इयत्ता ५ वीतील विद्यार्थिनी रिद्धी कमलेश मिश्रा (वाकोला महानगरपालिका हिंदी शाळा क्रमांक २) हिने ७९.१९ टक्के गुण मिळवून बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमधून प्रथम क्रमांक मिळविला. तसेच विद्यार्थिनी रोशनी संतोष तिवारी (वाकोला महानगरपालिका हिंदी शाळा क्रमांक २) हिने ७७.८५ टक्के गुण मिळवून द्वितीय आणि विद्यार्थिनी श्वेता अवधेश चौहान (बंदरपाखाडी महानगरपालिका शाळा) हिने ७६.५१ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
तसेच, इयत्ता ८ वीमधील विद्यार्थी शेख मोहम्मद उमर मोहम्मद सलीमने (देवनार वसाहत शाळा) ७९.७२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर, विद्यार्थी अंश दिलीप यादवने (दिंडोशी वसाहत महानगरपालिका हिंदी शाळा क्रमांक २) ७८ टक्के आणि विद्यार्थिनी स्वीटी अनिलकुमार पाढीने (काजूपाडा महानगरपालिका हिंदी शाळा क्रमांक. १) ७४ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
गुणवत्तेचा आलेख चढता
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता ८ वी ) परीक्षेत २०२२ ते २०२५ या चार वर्षांत महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आलेख वाढत आहे. २०२२ मध्ये या परीक्षेत इयत्ता ५ वीमधील २३०२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यापैकी २०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर १८४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. २०२३ मध्ये ५३७ विद्यार्थ्यांपैकी २८९ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत आपले स्थान पक्के केले होते. तसेच, २०२४ मध्ये ८२६ पैकी ३१७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. यंदा म्हणजेच २०२५ मध्ये १२३४ विद्यार्थ्यांमधील तब्बल ५३६ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.