मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरीजवळ बुधवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात आलिशा पोर्शे गाडीचा अपघात झाला. या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. निओ सॉन्क्स (२२) असे जखमी तरुणाचा नाव असून, त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी बीएमडब्ल्यू आणि पोर्शे या दोन आलिशाल गाड्यांची शर्यत सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी मात्र त्याला अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

जोगेश्वरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सॉन्क्स मध्यरात्री २.३० च्या सुमारास आपल्या पोर्शे कारने दक्षिण दिशेने अंधेरी लोखंडवाला परिसराकडे जात होता. त्याचा मित्र मागून बीएमडब्ल्यू गाडीने येत होता. महामार्गावरील खड्डा चुकवताना सॉन्क्सचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि मोटारचा वेग जास्त असल्याने ती थेट दुभाजकावर धडकली.

सुदैवाने या अपघातात कोणतेही पादचारी जखमी झाले नाही किंवा इतर अन्य वाहनांना धडक दिली नाही. हा अपघात इतका भीषण होता की पोर्शे गाडीच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चुराडा झाला.

चालकाविरोधात गुन्हा दाखल

“पोर्शे गाडीचा चालक निओ सॉन्क्सविरुद्ध जोगेश्वरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२५ (ब), २८१ आणि मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यरात्री गाड्यांच्या शर्यतीची चर्चा?

मध्यरात्री रस्ता मोकळा होता. त्यावेळी या दोन्ही आलिशान गाड्यांची शर्यत सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. सध्या आम्ही तपास करत आहोत. त्या दोन्ही वाहनचालकांनी शर्यत लावली होती का ते तपासले जाईल, अशी माहिती जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इक्बाल शिकलगर यांनी दिली.