मुंबई : मुंबई विमानतळावरील विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या. विमानतळ प्राधिकरणाने तात्काळ याबाबतची माहिती सर्व यंत्रणांना दिल्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली. पण विमानात काहीही संशयास्पद सापडले नाही. याप्रकरणी धमकीचा दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. याप्रकरणी एका संशयीताला अंधेरी परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून आझाद मैदान पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयीताला नोटीस देऊन सोडण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास धमकीचा दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने दुपारी २ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, विमानतळ, मुंबई हे बॉम्बस्फोट करून उडविणार असल्याची धमकी दिली होती. सर्वत्र तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. त्यावेळी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीला शोध घेतला असता तो साकीनाका पोलीस ठाणेच्या परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काशीद व गुन्हे प्रकटीकरण पथक तेथे रवाना झाले. पण त्या व्यक्तीचा मोबाइल बंद असल्याचे निष्पन्न झाले. अखेर पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला. संशयीत व्यक्तीचे छायाचित्र व नाव मिळविले. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने अंधेरी एमआयडीसी परिसरातील कपड्यांच्या छोट्या कारखान्यात काम करणारा संशयीत मनजीत कुमार गौतम (३५) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी करून त्याला आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आझाद मैदान पोलिसांनी गौतमला नोटीस देऊन सोडले.

पत्नीसोबत वाद

गौतम हा व्यवसायाने शिंपी आहे. त्याचा पत्नीसोबत वाद झाला होता. त्यानंतर गौतमने नैराश्यातून मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून मला जेलमध्येच जायचंय, मला मरायचंय’, असेही सांगितले. आरोपीविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नाही. आम्ही त्याला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पत्नीसोबत वादातून नैराश्यातून त्याने हा प्रकार केल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरक्षा यंत्रणांच्या कार्यपद्धतीत बदल

धमक्यांच्या संदेशांमुळे विमानतळावरील सुरक्षा अधिक आव्हानात्मक व गुंतागुंतीची बनली आहे. धमक्यांसाठी विशेषतः समाजमाध्यमांचा वापर होत असल्यामुळे आता विमानतळ सुरक्षा यंत्रणांनी या धमक्यांचे मूल्यमापन करताना बहुस्तरीय दृष्टिकोन अवलंबण्याचा, तसेच धमकीच्या विश्वासार्हतेची व गंभीरतेची खात्री करण्यासाठी विविध घटकांचा विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी धमकीला ‘विशिष्ट’ किंवा ‘अविशिष्ट’ म्हणून वर्गीकृत करण्यापूर्वी, तिच्या माहितीच्या स्रोताची विश्वासार्हता विचारात घेण्याच्या सूचना सुरक्षा रक्षकांना करण्यात आली आहे. गेल्यावर्षी सुरक्षा यंत्रणांनी कार्यप्रणालीत अनेक बदल केले आहेत.